आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह ,अर्धा तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पिंपळगाव, खडकी, कळंब, चांडोली, भराडी, खडकी, अवसरी या ठिकठिकाणी परतीच्या पावसाने थैमान घातले असल्याने खरीप हंगामातील बटाटा,कांदा,मका, फ्लोअर यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र धो धो पाऊस पडत असल्याने पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत आहेत. सोमवारी दुपारी 3 वाजता पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसाच्या जोरदार सरी झाल्याने सखल भागात पाणी साचून राहिले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्याच्या बहुतांश भागात पाऊस झाल्याने शेतीमध्ये पाणी साचू लागले आहे. शेतकर्यांनी बँका, पतसंस्था, सोसायट्यांची कर्जे काढून खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली मात्र, काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिके वाया गेली असल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे.
ग्रामस्थांनी भरपाईची व त्यासाठी नुकसानाचा पंचनामा करण्याची मागणी केली आहे. मात्र, शेतपिकांचे नुकसान होऊनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सुरुवातीपासूनच जास्त पावसाने शेतकरी संकटात आहेत.आता आलेले जेमतेम उत्पन्नही हातातून गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. याच ऑकटोबर महिन्यात पाच व सहा तारखेला व नंतर दसऱ्याला दहा व अकरा तारखेलाही पाऊस झाला. पावसाने पिकांना कोंब फुटले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली असूनही जबाबदार अधिकारी पंचनामा करण्याचे आदेश देत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.