परळी तालुक्यात पावसाचा हाहाकार, सिरसाळ्याजवळ ओढ्यात पिकअप गाडी वाहून गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी परिसरात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला आहे. येथे जोरदार पाऊस झाल्याने नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे. यातच सिरसाळ्याजवळ पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्यात पिकअप वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात एकजण वाहून गेला तर दोघे जण पाण्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

परळी तालुक्यात सलग होत असलेल्या पावसामुळे ओढे, नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे सिरसाळा-मोहा अंबाजोगाई रस्त्यावरील कान्नापूर येथील गव्हाडा ओढ्यावर पूर आला. पावसामुळे वाहत असलेल्या पाण्याने रूद्ररूप धारण केले, पूर आलेला असताना रस्ता ओलांडणाऱ्या पिकअपची दुर्घटना घडली. या ओढ्यात एक चारचाकी पिकअप वाहून गेले. यात तीन प्रवासी अडकले होते, त्यापैकी दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तर अन्य एक जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

या पाण्यात वाहून गेलेल्या पिकअपला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. रईस अन्सरभाई अत्तार (35) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे.

शेतीचे प्रचंड नुकसान

परळी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार पावसामुळे हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला आहे. खरिप हंगाम उद्धवस्त झाला आहे. कापसाच्या वाती झाल्या आहेत, तर सोयबिनची माती झाली आहे. खरिप हंगामात झालेल्या प्रचंड नुकसानामुळे शेतकरी चिंतेत आहे.