
अहिल्यानगर शहरासह जिह्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस कोसळतच आहे. त्यामुळे सीना नदीला आठवडय़ात तिसऱ्यांदा पूर आला असून, नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. जिह्याच्या अनेक भागांतील नदी, नाले तुडूंब भरून वाहत असून, शेतांमध्ये पाणी घुसल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान विभागाने जिह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
शनिवारी (दि. 20) रात्री 8 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. शहराच्या बहुतेक भागांत या पावसाने जोरदार हजेरी लावली. नालेगाव, बोल्हेगावसह सावेडी उपनगरात जोरदार पावसाने झोडपून काढले. आधीच खड्डे असलेल्या मार्गावर वाहने चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. 21 सप्टेंबरला दिवसभर पावसाने उघडीप दिली. मात्र, सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. हा पाऊस रात्रभर कोसळत होता. त्यामुळे सीना नदीला पूर येऊन नगर-कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.
114 दिवसात जिह्यात 108.3 टक्के पाऊस
मान्सूनच्या 114 दिवसांत जिह्यात 108.3 टक्के पाऊस झाला. आतापर्यंत 443.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जून, जुलै महिन्यांत पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर 14 ऑगस्टपासून शहरासह जिह्यात तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने गेल्या 3 महिन्यांतील तूट भरून काढली होती. त्यानंतर पुन्हा सलग 2 दिवस पाऊस झाल्याने जिह्यात आत्तापर्यंत 108.3 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस भारतीय हवामान विभागाने जिह्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
केडगाव, भिंगार, कापूरवाडी, चास, मंडलांत अतिवृष्टी
शहर व तालुक्यात 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 12 महसुली मंडलांपैकी केडगाव (74.0 मि.मी.), कापूरवाडी (71.5 मि.मी.), भिंगार (72.3 मि.मी.), चास (74.0 मि.मी.), चिचोंडी पाटील (72.0 मि.मी.) या 5 मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. याशिवाय नालेगाव मंडलात 57.5 मि.मी., नागापूर 21.3, सावेडी 54.0, वाळकी 55.8, रुईछत्तीसी 38.3, नेप्ती 53.3 मि.मी. असा पाऊस झला. नगर तालुक्यात सरासरी 58.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पाथर्डी, जामखेडमध्ये अतिवृष्टी
जिह्यात पाथर्डी (110.5 मि.मी.) व जामखेड (66.1 मि.मी.) या दोन तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. याशिवाय अहिल्यानगर 58.8 मि.मी., पारनेर 22.3, श्रीगोंदा 46.7, कर्जत 45.6, शेवगाव 56.9, नेवासा 25.0, राहुरी 5.7, श्रीरामपूर 4.8, राहाता 6.0 मि.मी. असा पाऊस झाला आहे.
मे महिन्यात नगर परिसरात 291.9 मि.मी. पाऊस
अहिल्यानगर तालुक्यात 27 मे रोजी चास आणि वाळकी मंडलांत ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. मे महिन्यात नालेगाव मंडलात 156.2 मि.मी. सावेडी 296.7, कापूरवाडी 192.3, केडगाव 323.4, भिंगार 290.6, नागापूर 274.9, जेऊर 188, चिचोंडी पाटील 285.3, वाळकी 382.8, चास 430.3, रुईछत्तीसी 339.8, नेप्ती 341.2 मि.मी. पाऊस झाला आहे. नगर शहरासह तालुक्यात मे महिन्यात सरासरी 291.9 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
227 जणांची पुरातून सुटका
जिह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगाव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे-नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग तसेच नागरिकांच्या मदतीने 227 व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
अहिल्यानगर मनपा व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने सारोळा बद्दी, जामखेड-पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील 70 जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. ? पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील 3जण, पिंपळगव्हाण 1, खरमाटवाडी 25, कोरडगाव 45 व कोळसांगवी येथील 12 व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली. ? जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे 4 व्यक्ती, वंजारवाडी 30, शेवगाव तालुक्यातील खरडगाव 12 व आखेगाव येथील 25 नागरिकांना पुरामधून वाचविण्यात आले.
पाथर्डीत मुसळधार; अनेक गावांचा संपर्क तुटला, मोहटा गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेला
रविवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मोहटा देवी गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कारेगाव येथील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने भक्तांचे मोठे हाल झाले. सायंकाळी या पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. शहराकडे येणाऱ्या सर्वच पुलांवर पाणी आल्याने काही काळ शहराचा इतर गावांशी संपर्क तुटला होता.
रात्रीपासून पहाटेपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने नाणी नदी, कोरडगाव, कोळसांगवी, खरमाटवाडी, कारेगाव परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी प्रशासन व नागरिकांच्या मदतीने 75 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पिंपळगाव येथे पुराच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीचा जीव स्थानिकांनी वाचविला. मात्र, अनेक जनावरे, गाडय़ा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. अमावास्येनिमित्त मढी येथे मुक्कामी आलेले सुमारे 500 भाविक पूरस्थितीत अडकले. गावाचा संपर्क सकाळपर्यंत तुटला होता.
तिनखडी येथील तलाव फुटल्याने पाणीच पाणी झाले. धायतडकवाडी येथील पाझर तलाव धोकादायक स्थितीत असून, खालच्या वस्त्या जलमय होऊन शेतात पाणी घुसले आहे. कोरडगाव येथील नाणी नदीने रुद्ररूप धारण केले होते. घरे, दुकाने पाण्याखाली गेली. अग्निशमन व बचाव पथकांनी मदतकार्य केले. पागोरी पिंपळगाव येथील नागरिकांना दोरी व जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.
पाथर्डी शहरात मुंडे कॉम्प्लेक्ससह सर्वच उपनगरांत पाणी साचले. गाडगे आमराई, रंगार गल्ली या ठिकाणी पाणी शिरले. अनेक घरांच्या भिंती पडल्या. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने गाडगे आमराई परिसरातून दोन नागरिकांना पुरातून बाहेर काढले.