Kedarnath helicopter Crashed – केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

केदारनाथमध्ये लँडिग दरम्यान हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सला अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेलिकॉप्टरमधील पायलटसह तीनही लोक सुखरुप आहेत. ऋषिकेश एम्सहून रुग्णाला घेण्यासाठी ही हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्स केदारनाथमध्ये आली होती.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवणारी ही संजीवनी हेली अ‍ॅम्बुलन्स केदारनाथमध्ये एका रुग्णाला घेण्यासाठी आली होती. हेली अ‍ॅम्बुलन्समध्ये पायलटसह दोन डॉक्टर होते. लँडिंग करत असताना हेलिपॅडपासून 20 मीटर अंतरावर हेलिकॉप्टर अनियंत्रित होऊन कोसळले. पायलटच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हेलिकॉप्टरमधील पायलट आणि दोन डॉक्टरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत चौकशी सुरू आहे.