धरमजींना उर्दू शायरीवर पुस्तक लिहायचे होते, हेमा मालिनी यांना अश्रू अनावर

दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत हेमा मालिनी यांना अश्रू अनावर झाले. कधी विचारही केला नव्हता की असाही एक क्षण येईल, जेव्हा मला एक शोकसभा ठेवावी लागेल आणि तीही माझ्या धरमजींसाठी. संपूर्ण जग त्यांच्या निधनाचे दुःख करत आहे. माझ्यासाठी हा असा धक्का आहे, ज्यातून बाहेर पडणे कठीण आहे, असे भावुक उद्गार हेमा मालिनी यांनी या वेळी काढले. या प्रार्थना सभेला चित्रपट आणि राजकारण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांची एक हळवी बाजूही सांगितली. धर्मेंद्र यांना उर्दू शायरी करण्याची सवय होती. त्यांना मी एकदा म्हटले की, तुम्ही इतके छान लिहिताय तर यावर तुम्ही एक पुस्तक प्रकाशित का करत नाही. ते चाहत्यांना खूप आवडेल. त्यांना पुस्तक लिहायचे होते. त्याचे नियोजनही ते करत होते, परंतु त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले, असे हेमा मालिनी यांनी म्हटले.