
सामना क्रिडा प्रतिनिधी । मुंबई
कर्णधार सुनील छेत्रीचा अफलातून वेगवान खेळ आणि गोलरक्षक गुरप्रीत संधूचे भक्कम गोलरक्षण याच्या बळावर यजमान हिंदुस्थानी फुटबॉल संघाने अंतिम लढतीत केनियाचे आव्हान २-० असे सहज संपुष्टात आणून पहिला हीरो इंटरकॉण्टिनेंटल चषक दिमाखात पटकावला. कर्णधार छेत्रीने या सामन्यात दोन गोल नोंदवत संघाचा विजय तर साकारलाच, पण स्पर्धेत आठ गोल करण्याचा पराक्रम करीत आंतरराष्ट्रीय लढतीत ६४ गोल नोंदवण्याच्या सुपरस्टार लियोनेल मेस्सीच्या विक्रमाची बरोबरीही साधली. हिंदुस्थानी संघाच्या या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होते शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे (एमडीएफए) अध्यक्ष आदित्य ठाकरे. त्यांच्या उपस्थितीने हिंदुस्थानी संघासह उपस्थित हजारो फुटबॉल शौकिनांतही आगळे चैतन्य संचारले होते.
मुंबईकर फुटबॉल शौकीन मोठय़ा संख्येने आपल्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेस्टाईन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या हिंदुस्थानी संघानेही आज त्यांच्यावर तुफान प्रेम करणाऱया फुटबॉल शौकिनांची निराशा केली नाही. यजमान हिंदुस्थानच्या या जेतेपदामुळे देशातील फुटबॉल शौकिनांसाठी आजचा दिवस सुपर संडे ठरला. यावेळी ‘भारतमाता की जय’, ‘इंडिया, इंडिया’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘माँ तुझे सलाम’ या घोषणांनी अंधेरीचे शहाजीराजे क्रीडा संकुल स्टेडियम दणाणून गेले होते.
विक्रमी कर्णधाराचा गौरव
हीरो चषकामध्ये हिंदुस्थानला जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा आणि ६४ आंतरराष्ट्रीय गोल नोंदवून सुपरस्टार मेस्सीची बरोबरी करणारा हिंदुस्थानचा कर्णधार सुनील छेत्रीचा शिवसेना नेते-युवासेना प्रमुख व एमडीएफएचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशनचे प्रफुल्ल पटेल, विफाचे सीईओ हेन्री मेनेझीस, एमडीएफएचे उपाध्यक्ष साऊटर वाझ, शिवसेना सचिव आदेश बांदेकर हे मान्यवर उपस्थित होते.
थापाची चाल अन् दमदार गोल
केनिया संघाच्या फॉरवर्डस्नी पूर्वार्धात हिंदुस्थानी गोलवर जोरदार हल्ले चढवले, पण छेत्री आणि कंपनीने या सत्रात आठव्या मिनिटाला केनियन बचाव भेदला. अनिरुद्ध थापाने उजव्या बगलेतून अप्रतिम हल्ला रचला. कर्णधार छेत्रीने अचूक निशाणा साधत यजमान संघाला १-० असे आघाडीवर नेले. छेत्रीचा हा या स्पर्धेतील सातवा तर आंतरराष्ट्रीय लढतीतील ६३ वा गोल होता. त्यानंतर २९ व्या मिनिटाला हिंदुस्थानने केनियन गोलवर पुन्हा जोरदार हल्ला रचला. या संधीचा लाभ उठवत हिंदुस्थानी ‘गोल मशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया छेत्रीने स्पर्धेतील आपला आठवा आणि ६४ वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवत सुपरस्टार मेस्सीची बरोबरी साधली. मध्यंतराला हिंदुस्थानने २-० अशी शानदार आघाडी घेत आपल्या पहिल्या हीरो चषक इंटरकॉण्टिनेंटल विजेतेपदाकडे वाटचाल सुरू ठेवली होती.




























































