
नेहमीच्या वापरासाठी सोयीची म्हणून अनेक जण बाईक किंवा गाडीऐवजी स्कूटर घेण्याचा बेत आखतात. लहान मूल किंवा महिलांसोबत प्रवास करण्यासाठी ते सोयीचं पडतं. जर तुम्ही नवीन स्कूटर घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
हिंदुस्थानमधील नावाजलेली टू व्हीलर निर्मिती करणारी कंपनी हिरो मोटोकॉर्प आता लवकरच आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच करणार आहे. यासाठी हिरोने नुकताच आपला इलेक्ट्रिक वाहनांचा नवीन ब्रँड ‘विडा’ची घोषणा केली आहे. कंपनीने विडा ब्रॅण्डच्या लोगोचे देखील अनावरण केले आहे.
या स्कूटरच्या निर्मितीसाठी कंपनीने 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली असून, हिरोच्या आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील प्लांट मध्ये या स्कुटरची निर्मिती केली जाणार आहे. यंदा 1 जुलै 2022 रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात विक्रीसाठी लाँच करणार आहे.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हिरोने आपल्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरची पहिली झलक जारी केली होती. शुक्रवार 4 मार्च रोजी हिरोने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर आपल्या नव्या ब्रॅण्डचा लोगो जारी केला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदुस्थानच्या बाजारात एथर, टीव्हीस आय क्यूब, बजाज चेतक, ओला एस 1 अशा विविध इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बाजारातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी हिरोने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाखाच्या आत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जास्त रेंज मिळण्यासाठी बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी
एका चार्जिंगवर स्कूटर जास्तीत जास्त धावण्यासाठी कंपनी बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी आणणार आहे. यासाठी हिरोने तैवान येथील गोगोरो या कंपनी सोबत करार केला आहे. येत्या काळात हिरो आपली इलेक्ट्रिक मोटारसायकल देखील लॉंच करणार आहे.


























































