दहशतवाद्यांकडून हिंदुस्थानात घातपाताचा कट; 15 शहरांमध्ये हाय अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बकरी ईद आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशात दहशतवाद्यांचा मोठा घातपात घडवण्याचा कट असल्याचा इशारा आयबी अर्थात केंद्रीय गुप्चर यंत्रणेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, दिल्लीसह 15 मोठया शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील आठवडय़ात मोठे सण असल्यामुळे देशभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

कश्मीर, पूर्वोत्तर हिंदुस्थानातील शहरांवर दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला होण्याची शक्यता आयबीने व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने 370 कलम रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या कश्मीरात अशांतता आहे. पाकिस्तानातही सरकारच्या निर्णयाला प्रचंड विरोध होत असून कश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा तसेच वातावरणाचा आढावा घेण्यासाठी अजित डोवाल कश्मीर, अनंतनागच्या दौऱ्यावर आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समुद्री जिहादाचा कट

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामासारखी घटना घडण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून समुद्री जिहादाचा कट रचला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे असे हिंदुस्थानी नौदलाने स्पष्ट केले आहे. नौदलाचे उपप्रमुख यांनी याबाबतची माहिती दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे हिंदुस्थानात हल्ला करण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे ते म्हणाले.