सहमतीच्या संबंधांत अल्पवयीनाला शिक्षा करण्यासाठी पोक्सो कायदा नाही – उच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीनांमध्ये संमतीने झालेल्या शारीरिक संबंधांबद्दल त्यांना शिक्षा मिळावी यासाठी पोक्सो कायद्याची निर्मिती झालेली नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोन वर्षांपासून कैद असलेल्या तरुणाला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं.

या प्रकरणातील आरोपीने एका अल्पवयीन मुलीशी 2020मध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी आरोपीचं वय 22 वर्षं होतं आणि मुलगी 18 वर्षांहून कमी वयाची होती. काही दिवसांनी जानेवारी 2021मध्ये आरोपीने या मुलीशी पुन्हा तिच्या सहमतीने संबंध ठेवले होते. याबाबत मुलीच्या आईला कळल्यानंतर तिने दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने म्हटलं की, अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवल्यामुळे आरोपी सुमारे दोन वर्षं कारागृहात आहे. जर तो अशा प्रकारे सराईत गुन्हेगारांसोबत राहिला तर ते त्याच्यासाठी नुकसानकारक ठरेल. नजिकच्या काळात हा खटला सुरू होण्याचीही चिन्हं दिसत नाहीत. तसंच, पीडितेच्या जबाबानुसार तिच्या सहमतीने हे संबंध प्रस्थापित झाले होते. पोक्सो हा कायदा लहान मुलांविरुद्ध होणारे लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी आणि त्यांना शिक्षा मिळण्यासाठी अस्तित्वात आला आहे. अल्पवयीन मुलीशी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले म्हणून शिक्षा करण्यासाठी पोक्सो कायदा बनलेला नाही, असं स्पष्ट करून न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.