
राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱयाचा हेतू स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे नमूद करत उच्च न्यायालयाने एका ज्येष्ठ नागरिकाविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द केला. हा ज्येष्ठ नागरिक चेंबूर येथील आहे. 2017 मध्ये प्रजासत्ताकदिनी इमारतीच्या गच्चीवर ध्वजारोहण झाले. त्यावेळी तिरंगा उलटा फडकला गेला. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या ज्येष्ठ नागरिकाने याचिका दाखल केली.
न्या. अश्विन भोबे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्ते ज्येष्ठ नागरिक केवळ ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. तिरंग्याचा अपमान करण्याचा या ज्येष्ठ नागरिकाचा हेतू नव्हता, असे स्पष्ट करत न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. या ज्येष्ठ नागरिकाने तिरंगा उलटा लावला नव्हता किंवा कोणत्याही प्रक्रियेत ते सहभागी झाले नव्हते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
माफीनामा
या ज्येष्ठ नागरिकाने न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर केला. त्याची नोंद न्यायालयाने करून घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिक केवळ ध्वजारोहणासाठी उपस्थित होते, अशी साक्ष इमारतीच्या सुरक्षारक्षकाने दिली आहे, असेही न्या. भोबे यांनी नमूद केले.






























































