एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा, हायकोर्टाकडून याचिका निकाली

एमसीए निवडणुकीचा वाद अखेर मार्गी लागला आहे. निवडणुकीसाठी 24 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर जुन्या सदस्यांनी आक्षेप घेत दाखल घेतलेली याचिका हायकोर्टाने निकाली काढली आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांना दाद मागायची असेल तर त्यांनी नव्याने याचिका दाखल करावी, असे न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने नमूद केले. त्यामुळे 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 12 नोव्हेंबर रोजी होणार असून इच्छुक उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीला एमसीएचे जुने सदस्य श्रीपाद हळबे व अन्य काही जणांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारणे न देता त्यांच्या हरकती फेटाळल्या व 24 ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर हरकती फेटाळल्या. त्याची कारणे निवडणूक अधिकाऱ्यांनी द्यावीत तसे आदेश न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रियाज छागला व न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर आज शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. तेव्हा खंडपीठाने याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यास सांगत याचिका निकाली काढली.