
तपास करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. याप्रकरणी तुरुंगातील चौकशीची आवश्यकता नाही हा आरोपींचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिघा आरोपींची प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.
इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारवाडी, जम्नूदा शिवार येथे एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पंचनाम्यासाठी त्याठिकाणी गेले. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलला धमकावण्यात आले. तसेच 50 ते 60 जणांच्या जमावाने धक्काबुक्की करत मारहाण केली.
याप्रकरणी सुमित्राबाई खडके, काशीनाथ आगिवले, रामू खडके यांच्यासह इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी आरोपींनी अॅड. विवेक आरोटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली त्या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अटीशर्तीसह तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.