प्रत्येकाला सन्मानाने निरोगी जीवन जगण्याचा अधिकार, 62 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय हायकोर्टाकडून कायम

अपघातानंतर विमा नाकारणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. प्रत्येकाला सन्मानाने निरोगी जीवन जगण्याचा अधिकार असून या अधिकाराच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे स्पष्ट करत मोटार वाहन अपघात दावा प्राधिकरणाने कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या 62 लाखांच्या भरपाईच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

अभिनेता शाहरुख खान याच्या रेड चिलीज या निर्मिती कंपनीत चारू खंडाल ही ऑनिमेटर म्हणून नोकरीला होती. मार्च 2012 साली ती रिक्षाने घरी जात असताना कारने तिच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात खंडाल हिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली व तिच्या मानेच्या खाली अर्धांगवायू झाला होता. 2018 साली तिचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर खंडाल हिच्या कुटुंबाने जून 2014 मध्ये मोटार अपघात दावा प्राधिकरणासमोर भरपाईसाठी दावा दाखल केला होता.

मोटार वाहन कायदा अपघातग्रस्त किंवा अपघातात मृत्यू पडलेल्यांना भरपाईचे लाभ देण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. तरुणीच्या अपघाताची घटना हृदयद्रावक आणि दुःखदायक असून अपघातानंतर तिचे जगणे बिकट झाले. इतकेच नव्हे तर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.