बुलढाण्यात विषबाधा झालेल्यांवर रस्त्यावर उपचाराची वेळ का आली? न्यायालयाचे मिंधे सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश

बुलढाणा जिल्ह्यात विषबाधा झालेल्या रुग्णांवरील उपचारातील हलगर्जीपणाची उच्च न्यायालयाने शुक्रवारी गंभीर दखल घेतली. रुग्णांवर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर उपचार करण्याची वेळ का आली? एखाद्या रुग्णाची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाली असती तर त्याला जबाबदार कोण होते? त्यावेळी काय केले असते? अशा शब्दांत न्यायालयाने मिंधे सरकारला खडसावले.

संभाजीनगर व नांदेड जिह्यातील सरकारी रुग्णालयांत घडलेल्या मृत्युतांडवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने ‘सुमोटो’ जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘ऑमिकस क्युरी’ अॅड. मोहित खन्ना यांनी बुलढाण्यातील सोमठाणा गावातील विषबाधेच्या घटनेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार केले गेले. झाडाच्या फांदीला सलाईन अडकवले होते. या विदारक परिस्थितीचा व्हिडीओ अॅड. खन्ना यांनी न्यायालयाला दाखवला. त्याची गंभीर दखल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने घेतली आणि याबाबत दहा दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.