
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा तसेच त्याच्याविरोधातील खटला रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. आरोपीने लैंगिक अत्याचार केलेल्या तरुणीशीच विवाह केल्याने न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची त्याची मागणी मंजूर केली आहे.
शीव-प्रतीक्षानगर येथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची ‘शादी डॉट कॉम’ या मॅट्रीमोनिअल साइटवर पनवेल येथे राहणाऱ्या 25 वर्षीय आरोपीसोबत ओळख झाली. आरोपीने लग्नाचे वचन देत तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पत्रिका जुळत नसल्याचे कारण देत त्याने तिला लग्नाला नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच वडाळा पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने गुन्हा दाखल केला सामंजस्याने यावर तोडगा काढत दोघांनी लग्न केले. त्यानंतर आरोपीने गुन्हा रद्द करण्यासाठी अॅड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा आरोपीने सहमतीने त्याच मुलीशी लग्न केल्याचे अॅड. गुप्ता यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरोधातील गुन्हा, आरोपपत्र व खटला रद्द करण्याचे पोलिसांना आदेश दिले.





























































