बिल्डरांच्या वर्चस्वामुळेच मुंबई, नवी मुंबईत बेकायदा बांधकामे : हायकोर्ट

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई, नवी मुंबईत बांधकाम क्षेत्रात बिल्डरांचेच वर्चस्व असल्यामुळे कायदे पायदळी तुडवले जातात आणि बेकायदा बांधकामांना पेव फुटते. या बेकायदा बांधकामांवर वचक ठेवण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत की नाहीत, असे खडसावत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठाने या प्रकरणी राज्य सरकारला जाब विचारला. एवढेच नव्हे तर अशा हेकेखोर विकासकांमुळे कोटय़वधी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असून या बिल्डरांना रोखण्यासाठी आता पोलिसांनीच कारवाई केली पाहिजे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढला असून शहर विकास आराखडय़ानुसार इमारत बांधणे गरजेचे असतानाही अनेक भूमाफिया तसेच विकासकांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून इमारती बांधल्या आहेत. या प्रकरणी संदीप ठाकूर यांनी माहितीच्या अधिकारात याबाबतची माहिती मिळवली असून हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

गेल्या सुनावणी वेळी नवी मुंबईत अनेक बेकायदा इमारतींना ओसी नसतानाही त्या ठिकाणी रहिवासी वास्तव्य करीत असल्याचे उघडकीस आले होते. याची दखल घेत हायकोर्टाने नवी मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींची माहिती देण्यास बजावले होते.