
भेसळयुक्त इंधन बाजारात सहज उपलब्ध झाल्यास लोकांचा कायद्यावर विश्वास राहणार नाही. अशा प्रकारचे इंधन नागरिकांच्या आरोग्यासाठी व अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
हेतन व यश गंगवाणी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने हे परखड मत व्यक्त केले. भेसळयुक्त इंधनाने वाहन व मशिनला धोका होतोच, पण याने स्फोट होण्याची व आग लागण्याची शक्यता अधिक असते. बनावट इंधनाने नियामक मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असेही न्यायालयाने नमूद केले.
या आरोपींचा गुन्हा गंभीर आहे. सामान्य गुह्यासारखे त्याकडे बघता येणार नाही. आरोपींनी एकाच ई-मेल आयडीवरून विविध खाती हातळली आहेत. या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला.
महसुलावर परिणाम
भेसळयुक्त इंधनामुळे राज्याच्या महसुलावर परिणाम होतो. त्यामुळे अशा गुह्याकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. यातील सत्य समोर यायला हवे. त्यासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
– उरण पोलिसांनी या दोघांसह अन्य आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. गेल्या वर्षी 12 जुलैला इंधनाचे आठ टँकर संशयास्पद उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी हे टँकर ताब्यात घेतले. या टँकरमधील इंधनाची चाचणी करण्यात आली. टँकरमधील इंधन भेसळयुक्त डिझेल असल्याचे चाचणीत उघड झाले. यात होणारी अटक टाळण्यासाठी या दोघांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.


























































