कोरोनाच्या संकटात मुंबई पोलिसांचे कार्य उत्तम! मुंबई उच्च न्यायालयाने केली प्रशंसा

कोरोना संकटात कामाचा प्रचंड ताण असतानाही सर्व अडचणींचा सामना करत मुंबई पोलीस करत असलेल्या कामाला तोड नाही. मुंबई पोलीस उत्तम काम करत आहेत. जगभरात त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले जात आहे. मुंबईकरांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कामाची प्रशंसा केली.

नवी मुंबईतील रहिवासी सुनयना होली यांनी 25 ते 28 जुलै दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह व्यंगचित्र पोस्ट केले होते. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या विरोधात तीन गुन्हे दाखल केले. ते गुन्हे रद्द व्हावेत व आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुनयना यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर त्या याचिकेवर सुनावणी झाली. चौकशीसाठी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर रहावे अशी नोटीस देऊनही सुनयना या त्याला दाद देत नाहीत अशी माहिती यावेळी सरकारी वकील अॅड. जयेश याज्ञिक यांनी खंडपीठाला दिली.

सुनयना यांचे वकील अॅड. अभिनव चंद्रचूड यांनी आपल्या अशिलाची प्रकृती ठीक नसल्याने त्या पोलीस ठाण्यात हजर राहू शकल्या नाहीत असे सांगत येत्या 2 नोव्हेंबर रोजी त्या हजर होतील असे सांगितले. या युक्तिवादानंतर खंडपीठाने मुंबई पोलीस सद्यस्थितीत करत असलेल्या अविश्रांत कामाची प्रशंसा केली आणि सुनयना यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे सांगत 23 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या