बारा वर्षे काय केले, कारवाई का नाही केली? चिल्ड्रन हेममध्ये पार्टीत गतिमंद मुलींना नाचवले, अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश

मानखुर्द येथील चिल्ड्रन एड सोसायटीत थर्टी फर्स्टची पार्टी करत त्यात गतिमंद मुलांना नाचवल्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने आज सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. जनहित याचिका दाखल करून बारा वर्षे उलटली, याप्रकरणी तुम्ही काय केलेत? संबंधितांवर कारवाई का नाही केली असे खडसावत न्यायालयाने अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली 13 वर्षांपूर्वी थर्टी फर्स्ट डिसेंबरला मानखुर्द येथील चिल्ड्रन हेम मध्ये ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते तसेच चिल्ड्रन होममधील 350 मुलांपैकी 29 मुलींना या पार्टीत सहभागी करून नाचवण्यात आले. याप्रकरणी संगीता पुणेकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. आज सोमवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे  यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने नमूद केले की, या घटनेला 13 वर्षे झाली आहेत, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही हे धक्कादायक असल्याचे मत खंडपीठाने नोंदवले आहे.

शिक्षेचा अहवाल सादर करा

खंडपीठाने सरकारला याप्रकरणी झापतानाच अपंग व्यक्ती आयुक्तांना या प्रकरणाची सहा आठवडय़ांत चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले तसेच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करून शिक्षेबाबतचा अहवाल तीन महिन्यात राज्य सरकारला सादर करण्यास बजावले.