वानखेडे यांना अटक करायची असल्यास तीन दिवस आधी नोटीस पाठवा! हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या विरोधात काही तक्रारी दाखल झाल्याने मुंबई पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणी कारवाई होऊ नये यासाठी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत वानखेडे यांना तूर्तास दिलासा दिला. राज्य सरकारने कुठलीही कठोर कारवाई करू नये व वानखेडे यांना अटक करायची असेल तर तीन दिवसांपूर्वी त्यांना नोटीस पाठवावी, अशा सूचना खंडपीठाने सरकारला केल्या.

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीचे समीर वानखेडे यांनी जोरदार कारवाई करत आर्यन खान, अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांना अटक केली तसेच एनसीबीने इतरही काही जणांना ताब्यात घेतले. या कारवाई प्रकरणी वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर बोगस प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्यापाठोपाठ वानखेडेंविरोधात मुंबई पोलिसांकडे 4 तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांनी चौकशीसाठी एक विशेष समिती तयार केली. मात्र माझ्यावरील आरोपांविषयी एनसीबीच्या तपास पथकाकडून आधीच चौकशी सुरू असताना  मुंबई पोलिसांच्या स्वतंत्र विशेष तपास पथकाद्वारे तपासाची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा सीबीआय किंवा एनआयएमार्फत तपास करावा, अशी विनंती वानखेडे यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळी राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी युक्तिवाद करताना वानखेडे यांच्या याचिकेला विरोध केला.