उच्चभ्रू नशेबाज तरुण-तरुणींना ड्रग्ज विकणारा गजाआड, दहा लाखांचे एमडी व  11 लाखांची रोकड हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्चभ्रू वसाहतींमधील नशेबाज तरुण-तरुणींना ड्रग्ज विकणारा पेडलर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या हाती लागला आहे. पोलिसांना त्याच्याकडे नऊ लाख 90 हजार किमतीचा एमडी व 11 लाखांची रोकड सापडली आहे.

वांद्रे युनिटचे अंमलदार पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, मरोळ येथील मिलिटरी रोड येथे राहणारा तौफिक इलियास शेख (49) हा त्याच्या घरातच ड्रग्ज विक्रीचा धंदा करतो. त्यानुसार मग वांद्रे युनिटच्या पथकाने तौफिकच्या घरावर छापा टाकला. त्यावेळेस त्याच्या घराची झडती घेतली असता नऊ लाख 90 हजार किमतीचे 55 ग्रॅम एमडी व 11 लाखांची रोकड असा 20 लाख 90 हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तौफिक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात समतानगर, विमानतळ, सहार, साकीनाका पोलीस ठाण्यात मारामारी, धमकी देणे, ड्रग्जप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

कफ सिरप व नायट्रेडझेपम टॅबलेट्ससह दोघांना पकडले

शिवाजी नगर पोलिसांनी रफिक नगर झेंडा गल्लीत बेकायदेशीरपणे कोरेक्स कफ सिरपच्या बाटल्या आणि  नायट्रेडझेपम टॅबलेट्सचा साठा करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले. असगर कुरेशी ऊर्फ बिल्ला (24), इस्तियाक खान  (40) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडे दीड लाख किमतीच्या 380 कोरेक्स कफ सिरपच्या बाटल्या आणि दोन लाख 40 हजार किमतीच्या नायट्रेडझेपम टॅबलेट्सचा साठा मिळाला.