
कन्फर्म रेल्वे तिकिटाशिवाय मुंबई कोकणचा प्रवास तसा खडतरच. महामार्गाचे काम अकरा वर्षांपासून रखडलेले, तर विमान सेवा कधी बंद, कधी सुरू… तीही बेभरवशाची. त्यामुळे कोकणात पोहोचायचे म्हणजे चाकरमान्यांना एकप्रकारे तारेवरची कसरतच करावी लागते. मात्र चाकरमान्यांना अखेर बाप्पा पावला असून मुंबईहून मालवणला अवघ्या चार तासांत जाता येईल. मत्स्य आणि बंदरे विकास विभागाने चाकरमान्यांना माफक दरात बोटीने प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार असून उद्या रविवारी भाऊच्या धक्क्यावर ही बोट दाखल होणार आहे.
मत्स्य आणि बंदरे विकास विभागाकडून एमटूएम नावाची हायटेक बोट सेवा मुंबईतील भाऊचा धक्का येथून सुरू होणार आहे. या सेवेमुळे चाकरमान्यांना साडेचार तासांत मालवण आणि विजयदुर्ग तर केवळ तीन तासांत रत्नागिरी गाठणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक बोटीच्या सहाय्याने चाकरमान्यांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता येणार आहे. सुरुवातीला ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाणार आहे. तसेच या सेवेचे तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे असेल असे मत्स्य आणि बंदरे विकास विभागाकडून सांगण्यात आले.
जलवाहतूक सेवेची वैशिष्टय़े
- नव्या हायटेक बोटसेवेतून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरी गाठता येणार.
- मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून बोटसेवा लवकरच सुरू होणार.
- मुंबई ते मालवण, विजयदुर्ग प्रवास अवघ्या साडेचार तासांत, रत्नागिरी तीन तासांत गाठता येणार.
- तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे राहणार आहेत.