मानखुर्द, मंडाळे, गोवंडी येथील झोपड्यांवर हायव्होल्टेज विजेच्या तारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या हायव्होल्टेज वीज वाहिनीच्या परिसरात (इंडक्शन झोन) असलेल्या घराच्या भिंतीमुळे सोमवारी मानखुर्द येथे अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता मानुखर्द, मंडाळे आणि गोवंडी परिसरातील दोनशेहून अधिक झोपड्यांच्या डोक्यावर हायव्होल्टेज विजेच्या तारा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या तारा आणि झोपड्यांच्या भिंतीमधली अंतर दोन मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे महापारेषणने संबंधित झोपड्या निश्चित करून त्याचे बांधकाम काढण्याबाबत मालकांबरोबरच महापालिका प्रशासन, पोलिस आणि विद्युत निरीक्षकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने येथे कधीही प्राणांतिक अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

मुंबईकरांना अखंड वीजपुरवठा व्हावा म्हणून महापारेषण आपल्या हायव्होल्टेज वीज वाहिन्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे 1500 मेगावॅट वीज आणते. त्यापैकी खारघर-ट्रॉम्बे आणि नेरूळ-ट्रॉम्बे अशा 220 केव्हीच्या दोन वीज वाहिन्या आहेत. त्या वाशीनंतर पुढे मानखुर्द, मंडाळे आणि गोवंडीच्या काही परिसरातून पुढे ट्रॉम्बे येथे रिसिव्हिंग स्टेशनला जोडल्या जातात. या वीज वाहिन्या ज्या परिसरातून आलेल्या आहेत, त्याच्या सात मीटरच्या इंडक्शन झोनमध्ये कोणतेही बांधकाम असणे धोक्याचे समजले जाते. मात्र मानखुर्द, मंडाळे आणि गोवंडी परिसरातील  अनेक झोपड्या आणि वीज वाहिन्यांमधील अंतर दोन मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे अपघाताची भीती असल्याचे महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विशाल अवचट यांनी सांगितले.

सात मीटरच्या इंडक्शन झोनच्या अटीकडे दुर्लक्ष

उच्चदाब वीज वाहिनीमधून 220 किलोवॅट एवढा वीज प्रवाह सुरू असतो.  त्यामुळे महापारेषणचे कर्मचारी दोन मीटर अंतरावरूनच  मेंटेनन्सचे काम करतात. तसेच सामान्यांनी वीज वाहिनीच्या इंडक्शन झोन म्हणजे सात मीटरपेक्षा जवळ जाऊ नये अशी अट असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच झोपडपट्टी परिसरात स्पार्किंग होऊन वारंवार अपघात घडतात.