उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अशासकीय सदस्य समित्या रद्द, भाजपला धक्का

1163
mantralaya-5

उच्च व तंत्रशिक्षण विभागात पक्षातील सदस्यांना स्थान देण्यासाठी भाजपकडून निर्माण करण्यात आलेल्या अशासकीय सदस्य समित्या रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला. या समित्यांवर तज्ञ सदस्य तसेच पक्षातील ज्या व्यक्तीला संबंधित विषयाची माहिती असेल असेच सदस्य नेमून समित्यांची फेरनियुक्ती केली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

विधान भवनात उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध समित्यांवर सदस्य म्हणून अशासकीय सदस्य (तज्ञ मार्गदर्शक) नियुक्त केले जातात. मात्र या समित्यांविषयी अनेक तक्रारी आल्या होत्या. या समित्यांवरील सदस्य विभागाच्या कामात ढवळाढवळ करीत असल्याच्याही तक्रारी होत्या. अखेर या समित्या रद्द करून नवीन समित्या गठित करण्याचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश उदय सामंत यांनी दिले.

ग्रंथालये सुविधांनी सज्ज करणार, वसतिगृहांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार
ग्रंथालयाची नव्याने पडताळणी करणे आवश्यक असून विभागांतर्गत असलेल्या राज्यातील ग्रंथालयाची पडताळणी करून अत्याधुनिक सुविधांसह ग्रंथालये तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पातळीवरही अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश उदय सामंत यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाविद्यालय, विद्यापीठे यांच्या रिकाम्या जागेवर अतिक्रमण झाले आहे ते तातडीने हटवण्याची कार्यवाही करावी आणि या जागेचा उपयोग करावा. तसेच जी महाविद्यालये, वसतिगृहे यांना 30 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचे संरचनात्मक लेखा परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करावे, तसेच विद्यापीठाने रिक्त पदांचा अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या