बारावी परीक्षेत राज्यात कोल्हापूर विभाग दुसरा, विभागाचा निकाल 93.28 टक्के

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2023मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला. यामध्ये राज्यात कोल्हापूर विभागाचा निकाल 93.28 टक्के लागला आहे. गतवर्षी पाचव्या स्थानावर असलेल्या कोल्हापूर विभागाने यंदा दुसऱया स्थानावर झेप घेतली. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा या कोल्हापूर विभागात 856 कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण एक लाख 18 हजार 31पैकी एक लाख 10 हजार 110 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात कोल्हापूर जिल्हा 93.89 टक्क्यांसह प्रथम राहिला. जिल्ह्यात 49 हजार 776पैकी 46 हजार 737 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सातारा जिल्हा 92.87 टक्के गुणांसह दुसऱया स्थानावर राहिला. येथे 35 हजार 76पैकी 32 हजार 578 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्हा 92.81 टक्के गुणांसह तिसऱया स्थानावर राहिला. येथे 30 हजार 795 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 5.77 टक्के अधिक

राज्यासह कोल्हापूर विभागातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. एकूण 62 हजार 676पैकी 56 हजार 773 मुले उत्तीर्ण झाली आहेत. 55 हजार 355पैकी 53 हजार 337 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 5.77 टक्के अधिक आहे.

सातारा जिल्हा 92.87 टक्के

बारावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याने दुसरे स्थान पटकाविले. जिल्ह्याचा निकाल 92.87 टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण 6.53 टक्क्यांनी जास्त आहे.

सातारा जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या 35 हजार 76 विद्यार्थ्यांपैकी 32 हजार 578 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुली 96.31 टक्के, तर मुले 89.78 टक्के आहेत. सातारा जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 98.15 टक्के, कला शाखेचा 80.07 टक्के, वाणिज्य शाखेचा 95.39 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा 96.46 टक्के, आयटीआयचा 95.14 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्याचा रिपिटर विद्यार्थ्यांचा टक्का मात्र अल्पच राहिला आहे. यामध्ये केवळ 44.89 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले आहेत.

सांगली 92.81 टक्के

बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 92.81 टक्के लागला. उत्तीर्णांमध्ये मुलींचे सर्वाधिक 95.94 टक्के प्रमाण आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 96.43 टक्के, तर आटपाडी तालुक्यात सर्वांत कमी 91.13 टक्के निकालाची नोंद झाली. जिल्ह्यात 33 हजार 406पैकी 33 हजार 179 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी 30 हजार 795 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक 97.85 टक्के लागला. कला शाखा 83.47, तर वाणिज्य विभागाचा 92.56 टक्के निकाल लागला आहे. किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रमात 94.39 टक्के निकालाची नोंद झाली. यंदाही पुन्हा मुलींनी बाजी मारल्याचे निकालातून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील 15 हजार 637 मुलींपैकी 15 हजार 3 जणी उत्तीर्ण झाल्या.

नगर जिल्हा 92.63 टक्के

बारावी परीक्षेचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला. नगर जिल्ह्याचा 92.63 टक्के निकाल लागला आहे. यंदाही पोरींनीच बाजी मारली आहे. 95.61 टक्के मुलींची सरासरी असून, तर 90.51 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. 62 हजार 739पैकी 58 हजार 120 विद्यार्थी ‘सक्सेस’ झाले आहेत. जिल्ह्यातून सर्वांत जास्त शेवगाव तालुक्याचा निकाल लागला आहे, तर सर्वांत कमी 89.41 टक्के निकाल अकोले तालुक्याचा लागला आहे. तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे ः अकोले 89.41 टक्के, जामखेड 96.00, कर्जत 17.21, कोपरगाव 94.95, नगर तालुका 95.08, नेवासा 93.83, पारनेर 93.92, पाथर्डी 92.21, राहाता 92.02, राहुरी 12.23, संगमनेर 92.71, शेवगाव 98.06, श्रीगोंदा 93.04, श्रीरामपूर 89.98 टक्के.

सोलापूरचा निकाल 94 टक्के

बारावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल 93.68 टक्के इतका लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, मुलींचा निकाल 96.17, तर मुलांचा निकाल 91.82 इतका लागला आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा बारावी परीक्षेकरिता 53,257 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. यांतील 52,742 मुलांनी परीक्षा दिली असून, 49,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल सांगोला तालुक्याचा लागला असून, 97.36 टक्के इतका आहे. जिल्ह्यात विज्ञान विषयाचा 98.06, वाणिज्य 95.56, कला 89.33, व्यावसायिक शिक्षण 91.48, तर टेक्निकल सायन्सचा निकाल 96.07 इतका लागला आहे.