हिमाचल प्रदेश – राज्यसभा निवडणुकीत भाजपला मत देणाऱ्या काँग्रेसच्या 6 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या 6 बंडखोर आमदारांवर विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया (Himachal Pradesh Assembly Speaker Kuldeep Singh Pathania) यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी पक्षाचा व्हिप न पाळणाऱ्या 6 आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे. सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, देवेंद्र भुट्टो, इंद्र लखन पाल, रवी ठाकूर आणि चैतन्य शर्मा अशी सहा जणांची नावे आहेत.

अपात्रतेच्या कारवाईबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया म्हणाले की, हिमाचल प्रदेशचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी पक्षांतर विरोधी कायद्यानुसार 6 आमदारांविरुद्ध याचिका दाखल केली होती. येथे 10व्या शेड्यूलनुसार निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मंजूर करताना काँग्रेसचे हे आमदार उपस्थित नव्हते. तसेच राज्यसभा निवडणुकीमध्ये या आमदारांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करत पक्षाचे व्हिपचे उल्लंघन केले. हे आमदार एका पक्षाकडून जिंकतात आणि दुसऱ्या पक्षाला मतदान करतात. आयाराम आणि गयारामचे राजकारण करू नये असे कायदा आयोगाच्या अहवालात नमूद आहे. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली, असेही पठानिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यसभेमध्ये झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे हिमाचल प्रदेशमधील राजकारण तापले आहे. येथे सत्तेत असतानाही काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेस आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांचा विजय झाला होता.

हिमाचल प्रदेशमध्ये 68 पैकी काँग्रेसचे 40, तर भारतीय जनता पक्षाचे 25 आमदार आहेत. 3 अपक्ष आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी 6 काँग्रेस आमदारांना अपात्र ठरवल्याने हा आकडा 62 वर आला असून मॅजिक फिगर 32 झाली आहे. अर्थात विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईनंतरही काँग्रेस बहुमतात (34 आमदार) आहे. मात्र गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित नाष्ट्याच्या कार्यक्रमाला चार आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांचे टेन्शन वाढले आहे.