
हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मनालीच्या टेकड्यांमध्ये अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रियन पायलट फिलिप याने तीन दिवसांपूर्वी दोन मित्रांसह धौलाधर पर्वतरांगेत फिरण्याच्या उद्देशाने बिलिंग व्हॅलीतून उड्डाण केले होते. त्याने तीन दिवसांत धौलाधर पर्वतरांगातील विविध ठिकाणी लँडिंग करत दोन रात्री घालवल्या. मात्र तिसऱ्या दिवशी पायलटचा तोल गेला आणि शनिवारी दुपारी 3.30 वाजता मनालीच्या रैनसुई येथे क्रॅश-लँडिंग झाले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या सहकारी पायलटने बीर बिलिंग पॅराग्लायडिंग असोसिएशनला या घटनेची माहिती दिली.
असोसिएशनने तात्काळ त्यांचे बचाव पथक आणि एसएआर पथक घटनास्थळी रवाना केले. बचाव पथकाने तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि रविवारी सकाळी 8 वाजता मनालीच्या टेकड्यांवरून पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढले. पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला हेलिकॉप्टरने चंदीगडमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
ऑस्ट्रियाचा फिलिप हा जगातील सर्वोत्तम पॅराग्लायडिंग पायलटपैकी एक आहे आणि त्याच्याकडे अनेक जागतिक विक्रम आहेत. बीर बिलिंगमध्ये आठ तासांत 280 किलोमीटरचे सर्वात लांब उड्डाण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. या साहसी खेळाचा थरार अनुभवण्यासाठी फिलिप दरवर्षी जगातील सर्वोत्तम पॅराग्लायडिंग व्हॅलीमध्ये प्रवास करतो.


























































