पुतीन दौऱ्याच्या वार्तांकनावरून हिंदुस्थानी मीडिया ट्रोल

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या 27 तासांच्या हिंदुस्थान भेटीचे वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने वार्तांकन केले त्यावरून सोशल मीडियात हिंदुस्थानी मीडियाची खिल्ली उडवली जात आहे. ‘हे पत्रकार आणि चॅनेलचे अँकर इतके अगाध ज्ञान नेमके आणतात कुठून,’ असा सवाल जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. याबाबत फेसबुक, एक्सवर अनेक पोस्ट केल्या जात आहेत. काहींनी याचे व्हिडीओदेखील बनवले आहेत.

पुतीन यांनी नुकताच हिंदुस्थानचा 27 तासांचा दौरा केला. जगभरातील विविध देशांच्या नेत्यांचे इतर देशांत जसे दौरे होतात तसाच हा एक औपचारिक दौरा होता, मात्र हिंदुस्थानी मीडियाने जगात एखादी अद्भुत घटना घडत असल्याप्रमाणे या दौऱयाच्या बातम्या दिल्या. प्रत्येक क्षणाची माहिती देण्यात आली. त्यात गांभीर्य कमी आणि कपोलकल्पित वर्णने जास्त होती. मोदी यांचे महिमामंडन करण्याचा प्रयत्न यात जास्त होता. लोकांच्या नजरेतून हे सुटणे शक्य नव्हते. साहजिकच त्याचे पडसाद सोशल मीडियात उमटले.

पुतीन हिंदुस्थानात आले तेव्हा पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करायला विमानतळावर गेले. हा प्रसंग अनेक वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी आणि अँकरनी रंगवून सांगितला. मोदी कसे प्रोटोकॉल तोडून गेले. दोघांची मैत्री किती घनिष्ठ आहे, असे टीव्हीचे अँकर सांगत होते. प्रत्यक्षात यात काहीच नवीन नव्हते. मोदींनी अनेकदा असे केले असल्याचे नेटकऱयांनी दाखवून दिले.

अशी झाली प्रश्नोत्तरे

प्रश्न ः रशियाशी संबंध मजबूत होण्यात कोणत्या पंतप्रधानांचा वाटा आहे?

उत्तर अशा पद्धतीने कोणाचे नाव घेणे हा सुसंस्कृतपणा नाही.

प्रश्न ः तुम्ही इतके तास कसे काम करता? आमच्या पंतप्रधानांप्रमाणेच तुम्ही सुट्टी घेत नाही का?

उत्तर अशा प्रश्नांना मी उत्तर देत नाही.

प्रश्न ः एससीओ परिषदेच्या वेळी लिमोझीन कारमध्ये तुमची मोदींशी काय चर्चा झाली होती?

उत्तर काहीच नाही. आम्ही अचानक समोर आलो. शिष्टाचार म्हणून मी त्यांना गाडीत बसायला सांगितले आणि तिथून निघालो. यात विशेष काही नव्हते.