
‘आज ‘फादर्स डे’ आहे. ‘फादर ऑफ नेशन’ म्हणजे राष्ट्रपिता. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की या देशाला बाप नाही. मात्र जगात हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. ज्यांच्या मनामनात आणि रोमारोमात हिंदुत्व आहे तो साहेबांना आपला बापच मानतो.’ असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात म्हणाले.
56 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत ठिणगी टाकली. 56 वर्षात देशभरात त्याचा वणवा झाला. आज त्या वणव्याचा 56 वा वर्धापनदिन आहे, असे संजय राऊत म्हणाले. ‘आतापर्यंत छप्पन झाली आहेत पण पुढे बरेच काही आहे हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ‘अयोध्येत आदित्य ठाकरे यांचे मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात स्वागत झाले. बाळासाहेबांचा वारसदार आला म्हणून साधूसंतांनी त्यांना आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आपल्या हिंदुत्वाला होता आणि बाळासाहेबांबद्दलची सद्भावना त्यात होती. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे आणि कसे आहे, कोणत्या दिशेने जातेय त्याचे मार्गदर्शन कोणाकडून घेण्याची गरज नाही.’ असा टोला खासदार राऊत यांनी विरोधकांना लगावला.
तेरा घमंड तो चार दिनका है! हमारी बादशाही तो खानदानी है!
राज्यसभेत एक जागा जिंकल्यानंतर घमेंडीने मिरवणाऱया विरोधकांवर संजय राऊत यांनी यावेळी जोरदार टीका केली. या राज्याची सूत्रे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील असे सांगताना ‘तेरा घमंड तो चार दिनका है, हमारी बादशाही तो खानदानी है’ असा सणसणीत शेर त्यांनी मारला. कुणी कितीही तलवारबाजी करू द्या, या बादशाहीला नख लावण्याची हिंमत अजून कोणाची झाली नाही, असे ते म्हणाले.
कंत्राटी पद्धतीने गुलाम नेमतात, सैन्य नाही!
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरही संजय राऊत यांनी यावेळी टीका केली. कंत्राटी पद्धतीने गुलाम नेमले जातात, देशाचे सैन्य नाही असे सांगत, जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतलेला नाही असे ते म्हणाले. देश पेटलाय पण महाराष्ट्र शांत आहे. कारण या राज्याची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत, असेही त्यांनी विरोधकांना बजावले. ‘मिस्टर फडणवीस’ नुसती कटकारस्थाने करून राज्य चालवता येत नाही, सर्वांना एकत्र घेऊन राज्य चालवावे लागते आणि ती क्षमता फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

































































