‘हनी ट्रप’प्रकरणी हिंगणगावातील व्यावसायिक पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर तालुक्यातील ‘हनी ट्रप’ प्रकरणात आज पोलिसांनी हिंगणगाव येथील व्यावसायिक बापू सोनवणे याला अटक केली. दरम्यान, या घटनेची व्याप्ती वाढत असून, सोनवणेकडून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रप प्रकरणात आत्तापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आता बापू सोनवणे (रा. हिंगणगाव) याला आज अटक केली आहे. बापू सोनवणे हा व्यावसायिक असून, त्याने ‘त्या’ महिलेला साथ देऊन इतरांना फसविण्याचा प्रकार केला. हे तपासामध्ये उघड झाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी सोनवणेला अटक केली आहे. तसेच त्याची आलिशान गाडीसुद्धा जप्त केली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या महिलेच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली असून, येथे काही बँकांची कागदपत्रे हाती लागली आहेत. तिच्याकडे असलेल्या मोबाईलवरून तिने आतापर्यंत कोणाकोणाला संपर्क केला; तसेच तिच्याकडे कोणते व्हिडीओ आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

आज अटक करण्यात आलेल्या सोनवणे याच्यावर नगर शहरातील कोतवाली, पारनेर यांसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे या गुह्याची व्याप्ती वाढत जाणार आहे.

फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा

‘हनी ट्रप’ प्रकरणात अटक केलेल्या महिलेकडून विविध प्रकारची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.