हिंगोली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते खडसेंच्या भेटीला; राजकीय चर्चेला उधाण   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

महाराष्ट्राचे माजी महसुलमंत्री आणि भाजपातील नाराज नेते एकनाथ खडसे यांची जळगाव येथे जाऊन हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते व कार्यकर्ते यांनी भेट घेतली. पक्षाला इशारा देण्याची संधी न सोडणाऱ्या खडसेंच्या भेटीसाठी मराठवाड्याच्या हिंगोलीतील कार्यकर्ते गेल्यामुळे राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले असुन राज्यभरातल्या समर्थकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

मुक्ताईनगरच्या होमपीचवर वाढदिवसाला एकनाथ खडसे यांनी ‘मी दोषी असेल तर तसे सांगा नाहीतर निर्दोष आहे म्हणुन सांगा’ अन्यथा राज्यभरात एल्गार यात्रा काढुन सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा दिला आहे. खडसेंच्या खच्चीकरणाचे प्रयत्न स्वपक्षातुन सुरु असतांना त्यांनी स्वभावाला मुरड घालत संयम बाळगला आहे. तथापि, पुन्हा मंत्री पद मिळत नसल्याने संधी मिळेल तिथे भाजप नेते एकनाथ खडसे हे सरकारला आणि पक्षाला सुचक इशारा देत असतात. खडसेंच्या खच्चीकरणाचे प्रयत्न सुरु असतांना हिंगोली व परभणी एकत्रीत जिल्ह्याचे नेतृत्व केलेले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशपांडे, सरसंघचालक मोहन भागवत यांचे वर्गमित्र डॉ. पुंजाजी गाडे, माजी शिक्षण सभापती पांडुरंग पाटील, भाजप नेते रामरतन शिंदे, सुभाष लदनिया, नरहरी पांचाळ, विष्णु जाधव, अनिल अगस्ती, माणिक पाटील भिंगीकर, किरण नाईक, नारायण कोटकर या हिंगोली जिल्हृयातील भाजप मंडळींनी जळगाव गाठुन एकनाथ खंडसे यांची भेट घेतली. यावेळी पुढील कार्याच्या वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे भेटीसाठी गेलेल्या एका जबाबदार कार्यककर्त्याने सांगितले.

दरम्यान, पुढील वाटचाल म्हणजे नेमके काय असा प्रश्न यामुळे समोर आला आहे. जिल्हृयातील स्थानिक नेतृत्वाविरुध्द नाराज असलेली मंडळी बड्या नाराज नेत्यांच्या भेटीला पोहचल्याने मोठे राजकारण शिजत असल्याचे बोलले जात आहे. २ सप्टेंबर रोजी एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाला भटण्यासाठी जाता आले नसल्यामुळे त्यांची भेट घेतल्याचे रामरतन शिंदे यांनी सांगितले.