आरोग्य कर्मचारी महिलेला हिंगोलीत पोलिसांची बेदम मारहाण

1898

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात कुठलेही काम नसताना रस्त्यावर फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी याचा गैरफायदा उठवला जात असल्याचे समोर आले असून पोलिसांकडून विनाकारण मारहाण केली जात असल्याचा आरोप होत आहेत. हिंगोली शहरात 25 मार्च रोजी एका आरोग्य कर्मचारी महिलेला एका महिला पोलीस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या आरोग्य कर्मचारी महिलेचे वडील स्वतः पोलिस जमादार असून त्यांनी ओळख देण्याचा प्रयत्न करूनही काहीही ऐकून न घेता महिला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप पीडित आरोग्य कर्मचारी महिलेने केला आहे.

प्रियंका साहेबराव राठोड असे मारहाण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव असून एनआरएचएम अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंतर्गत हिंगोली शहरातील मस्तानशाहा नगर भागामध्ये त्यांची नियुक्ती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यवेक्षणाचे काम करून परत जाण्यासाठी प्रियंका राठोड यांनी त्यांचे वडील पोलिस जमादार साहेबराव राठोड यांना फोन लावला. राठोड हे दुचाकी घेऊन आल्यावर प्रियंका यांच्यासह घरी जात असताना हिंगोली शहराच्या अग्रसेन चौक, नांदेड नाका परिसरामध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.

मारहाणीची हे पाप झाकण्यासाठी पोलिसांनी राठोड यांना हिंगोलीचे विभागातील झडपे रूग्णालयात दाखल केले. पाठीवर व डोक्यावर मारहाण झाल्याने प्रियंका राठोड यांच्या डोक्याला पाच टाके बसले आहेत. सध्या त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रियंका या कर्करोगाच्या रुग्ण आहेत. ओळखपत्र अथवा घराबाहेर पडण्याचे कारण न विचारता थेट मारहाण करण्याचे प्रकार हिंगोली शहरांमध्ये होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिस अधीक्षकांना व पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ओळखपत्र व कामाचे स्वरूप तपासण्या बाबत सूचना दिल्या आहेत की नाही असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

प्रियंका राठोड यांची आपबिती सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीमुळे बदनामी होऊ नये म्हणून पोलिसांनी राठोड यांचा अपघात झाल्याचा बनाव रचल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या