
सामना प्रतिनिधी । हिंगोली
मराठवाड्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या हिंगोली जिल्ह्यात दळणवळणाची साधने अपुरी आहेत. त्यामुळे मोठे उद्योग येत नाहीत. जिल्ह्यात हळद, कापुस, ऊस यासारखी पीके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. दळणवळणाच्या साधनांसह जिल्ह्यात पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देऊन कृषी प्रक्रिया उद्योगाची निर्मिती करण्याचा मानस असून त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी धनुष्यबाण या निशाणीवर भरघोस मतदान करुन मला विजयी करा, असे आवाहन हिंगोली लोकसभा क्षेत्राचे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील यांनी केले.
हिंगोलीतील महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने व जल्लोषात कामाला लागले असून पिंपळदरी, नांदापुर, कोंढुर, दिग्रस, शेवाळा, कळमनुरी, आखाडा बाळापुर येथे झालेल्या वेगवेगळ्या जाहीर सभा, महायुतीच्या बैठका, महारॅलीने सर्वत्र भगव्याचाच बोलबाला दिसून आला.
गावात राहुनच प्रचार करा – संपर्कप्रमुख आनंदराव जाधव
हिंगोली – लोकसभा मतदारसंघात शिवसेनेसह भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मागिल ८ दिवसात घेतलेल्या मेहनतीमुळे जबरदस्त वातावरण निर्मिती झाली असून महायुतीच्या प्रत्येक कार्यकत्र्याने त्यांच्या गावात व शहरात राहूनच आपआपल्या भागात प्रचार यंत्रणा राबवावी, असे आवाहन शिवसेनेचे हिंगोली लोकसभा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी केले.
हिंगोली शहरामध्ये ७ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेच्या तयारीसाठी महायुतीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, जिल्हा संघटक उध्दवराव गायकवाड, तालुकाप्रमुख कडुजी भंवर, शहरप्रमुख अशोक नाईक, आनंदराव जगताप, रामेश्वर शिंदे, प्रवीण जेठेवाड, रिपाईचे दिवाकर माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना संपर्कप्रमुख जाधव म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मोठ्या सभा व बैठका असतील त्यावेळीच गाव व शहर सोडावे. आपले गाव व शहर आणि बुथ प्रत्येकाने सक्षमपणे सांभाळल्यास मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्येक बुथवर मताधिक्य मिळवुन द्या – माजी आमदार गजाननराव घुगे
कळमनुरी – शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गावातील प्रत्येक बुथमध्ये असलेल्या मतदार व कुटूंबाचा अभ्यास करुन प्रत्येक बुथवर महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना मताधिक्य मिळवुन द्यावे, असे आवाहन माजी आमदार गजाननराव घुगे यांनी कळमनुरी येथे आयोजीत बुथप्रमुखांच्या बैठकीमध्ये बोलतांना केले. या बैठकीला लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, भाजपचे सुरजितसिंग ठाकुर, उपजिल्हाप्रमुख डी.के. दुर्गे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, शहरप्रमुख संतोष सारडा, बाळु पारवे, सुहास पाटील, नगराध्यक्ष उत्तम शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार गजाननराव घुगे यांनी काँग्रेसच्या खासदार व आमदारांनी ५ वर्षात केलेले एखादे तरी मोठे काम दाखवावे, असे जोरदार आव्हान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीचे हात बळकट करण्यासाठी हेमंत पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
बाळापुरात व्यापाऱ्यांची बैठक, शेवाळ्यात महारॅली व सभा
आखाडा बाळापुर – हिंगोली जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या आखाडा बाळापुर येथे शिवसेना-भाजपा महायुतीने बोलावलेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहत व्यापारी बांधवांनी विश्वास व्यक्त केला.
शेतकरी सुखी व संपन्न झाला तर व्यापार व उद्योगात भरभराट येते. यासाठी शेतीपुरक उद्योग निर्माण करुन रोजगाराला चालना देण्यासोबत व्यापार वृध्दीसाठी प्रयत्न करणार असल्याचे महायुतीचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले. बाळापुर येथील बैठकीनंतर शेवाळा येथे प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली. या सभेपुर्वी गावातून निघालेल्या महारॅलीने भगवा झंझावात निर्माण केला.
या सभेला उमेदवार हेमंत पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख संतोष बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार गजाननराव घुगे, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, डी.के. दुर्गे, मोहनसिंग बयास, बालाजीराव बोंढारे, शेषराव बोंढारे, महेश गोविंदवार, उपसभापती गोपु पाटील, रावसाहेब सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी खासदार शिवाजीराव माने यांनी या सभेमध्ये मागिल ५ वर्षात पुरस्कार आणुन कौतुक मिरवणाऱ्या खासदार राजीव सातव यांनी केलेले एखादे मोठे काम दाखवावे, असा टोला लगावला. तुम्ही पुरस्कार आणले, काम चांगले होते तर मैदानातून पळ का काढला ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्रचाराचा झंझावात, मतदारांच्या गाठीभेटी
वसमतचे आमदार तथा माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, उपजिल्हाप्रमुख सूनील काळे, संदेश देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, बालाजी तांबोळी, काशिनाथ भोसले, भाजप नेते अॅड. शिवाजी जाधव, नांदेड जिल्हा समन्वयक धोंडु पाटील, राजश्री हेमंत पाटील, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे व बाजीराव सवंडकर, गजानन भोसले, मुन्ना यादव, लखन शिंदे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसमत, सेनगाव, उमरखेड भागामध्ये विविध गावात भेटी देऊन मतदारांशी संवाद साधत झंझावती प्रचार केला. पुरजळ येथे झालेल्या बैठकीला संपर्कप्रमुख आनंद जाधव, भाजपचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख, आमदार तानाजी मुटकुळे, शिवसेनेचे जि.प. गटनेते अंकुश आहेर, राजाभाऊ मुसळे, जि.प. सदस्य श्रीशैल्य स्वामी, संजय परिहार यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

































































