उद्धव ठाकरेंचा फोन, जखमी शिवसैनिकांना दिला धीर; हेमंत पाटलांचा हिंगोलीकरांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आयोजीत केलेल्या कावड यात्रेवर धर्मांध मुस्लीमांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेले शिवसैनिक दिपक घुगे यांना फोनवर बोलून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धीर दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना दिली. तसेच खासदार हेमंत पाटील यांनी रस्त्यावर उतरत हिंगोलीतील व्यापारी व नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत दिलासा दिला. परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या सुचनेनुसार खासदार पाटील यांनी एसटी बसेस पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. यासोबतच जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेऊन जखमींना दिलासा देत वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या.

हिंगोलीत शिवसैनिकांच्या कावडयात्रेवर धर्मांध मुस्लीमांची दगडफेक, शिवसैनिकांचे प्रत्युत्तर

पोलिसांची दंगलीनंतर दंडेलशाही, बसस्थानकावरील प्रवासी, अंत्यविधीहून येणाऱ्या नागरिकांना मारहाण

हिंगोली शहर धर्मांध मुस्लीमांनी पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे समजताच सकाळी सव्वा दहा वाजता खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीमध्ये दाखल होत शहरात फेरी मारली. सर्वप्रथम शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर व कावडयात्रेत सहभागी शिवसैनिकांना संबोधीत करुन खासदार पाटील यांनी शिस्तीत यात्रा काढण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापारपेठेत फिरुन त्यांनी व्यापाऱ्यांना घाबरुन न जाता व्यवहार सुरळीत करण्याचे आवाहन केले. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जखमी पत्रकार संतोष भिसे, निलेश गरवारे, शिवसैनिक दिपक घुगे, अभिषेक बांगर, पवन बांगर यांच्यासह अन्य जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती देत जखमी शिवसैनिकांसोबत बोलणे करुन दिले. तसेच पोलीस महासंचालकांसोबतही संवाद साधून पोलिसांकडून व धर्मांधाकडुन झालेल्या प्रकरणाची माहिती दिली.

hemant-patil

शहरात झालेल्या दगडफेकीनंतर साडे नऊ वाजेपासुन एसटी बसेस बंद होत्या. शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या सुचनेनुसार खासदार पाटील यांनी परभणी विभागाचे एसटीचे नियंत्रक मुकुंद जोशी, आगारप्रमुख पुंडगे यांना सोबत घेऊन चालक व वाहकांची भेट घेत एसटी बसेस सुरू होण्यासाठी मदत केली. यामुळे पाच तास बसस्थानकावर ताटकळुन पडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला.