
श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील महाप्रसादासाठी होणाऱ्या किराणा खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, माहिती अधिकार कार्यकर्ते संजय बबुताई भास्करराव काळे यांनी निकृष्ट दर्जाच्या किराणा खरेदीचा आरोप करत मोठा गैरव्यवहार उघड केल्याचा दावा केला आहे.
संस्थानमध्ये दररोज सरासरी चाळीस हजारांहून अधिक साईभक्त महाप्रसादाचा लाभघेत असून, या प्रसादासाठी दरवर्षी सुमारे सत्तर ते शंभर कोटी रुपयांचा किराणा खरेदी केला जातो.
काळे यांनी ७ मे रोजी माहितीच्या अधिकारातून संस्थानच्या भांडार व खरेदी विभागाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसादालयातील भांडारातून गहू, तांदूळ, डाळी, काजू, किसमिस, लवंग, हरभरे, छोले आदी १७ प्रकारच्या किराणामालाचे नमुने स्वतंत्र पिशव्यांमध्ये घेतले. विशेष म्हणजे कोणत्या गोणीतून नमुने घ्यायचे, याचे स्वातंत्र्य संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते.
यानंतर हे नमुने घेऊन काळे खरेदी विभागात गेले असता, संबंधित ठेकेदारांनी सादर केलेले नमुने दाखविण्यात आले. काळे यांच्या आरोपानुसार, ठेकेदारांनी दाखवलेले नमुने “अ” दर्जाचे होते. मात्र, प्रत्यक्षात प्रसादालयात वापरला जाणारा माल ‘क’ दर्जाचा आढळून आला. ‘अ’ दर्जाच्या दराने निकृष्ट मालाचा पुरवठा करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संस्थानने अन्न व औषध प्रशासनाकडून मालाची तपासणी करून ‘खाण्यास योग्य’ असल्याचा दाखला घेत असले, तरी निविदेनुसार ठरलेल्या दर्जाचाच माल पुरवला जातो का, याची खातरजमा होत नसल्याचा मुद्दाही काळे यांनी उपस्थित केला. त्यांनी ही बाब प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली असून, याबाबत तक्रार दिल्यास कारवाई करू, असे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनाही प्रत्यक्ष नमुने दाखवून माल निकृष्ट दर्जाचा असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी पंचनामा करून नमुने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले.
‘साईभक्तांना निकृष्ट दर्जाच्या किराण्याचा महाप्रसाद दिला जात असेल, तर याला जबाबदार कोण?’ असा सवाल करत संबंधित अधिकारी व पुरवठादारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. खरेदी प्रक्रियेची चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी साईभक्त करीत आहेत.

























































