अणुहल्ल्यातील इमारत वाचवण्यासाठी जपानमध्ये स्वाक्षरी मोहीम

867

दुसऱ्या विध्वंसकारी महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमावर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात बचावलेली 20व्या शतकातील ऐतिहासिक इमारत वाचवण्यासाठी जपानी नागरिकांनी कंबर कसली आहे. अणुस्फोटापासून केवळ 2.7 कि.मी. अंतरावर असलेली लाल वीरांनी बांधलेली सरकारी इमारत ‘युद्ध स्मारक’ म्हणून जतन करावी यासाठी जपानच्या सुमारे 12 हजार नागरिकांनी सह्या केलेली ऑनलाइन विनंती याचिका हिरोशिमा शहर प्रशासनाला पाठवली आहे.

हिरोशिमा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 1945च्या दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते. हिरोशिमात जिथे अणुबॉम्बचा स्फोट झाला. त्या ‘ग्राऊंड झीरो’पासून बचावलेली तीन मजली सरकारी इमारत 2.7 कि.मी. (2 मैल) अंतरावर आहे. या भीषण हल्ल्यानंतरही ही 1913 मध्ये बांधलेली इमारत ताठ मानेने उभी आहे. त्यामुळेच ही इमारत न पाडता ती ‘युद्ध स्मारक’ म्हणून जपावी यासाठी जपानी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. या ऑनलाइन मोहिमेला आता समस्त जपानमधून मोठा पाठिंबा लाभत आहे. या इमारतीत जपानी लष्करासाठीचे गणवेश तयार केले जायचे, मात्र वारंवार येणाऱ्या भूकंपात ही इमारत तग धरू शकणार नाही. शेजारी राहणाऱ्या नागरिकांना इमारतीपासून धोका पोहचू शकतो. शिवाय ही इमारत जतन करण्याचा खर्चही अवाढव्य आहे असे कारण प्रशासनाने दिले.

वाचलेल्या चार सरकारी इमारती जपण्यासाठी प्रचंड खर्च
दुसऱ्या महायद्धातील हिरोशिमावरील अणुहल्ल्यातून शहरातील अनेक इमारती बचावल्या आहेत. शहरातील अशा चार ऐतिहासिक इमारतींपैकी तीन वास्तू स्थानिक प्रशासनाच्या तर एक इमारत जपान सरकारच्या मालकीची आहे. स्थानिक प्रशासनाच्या मालकीच्या गेनबाकू डोमसह अन्य तीन इमारती जतन करण्यासाठी 7.7 कोटी डॉलर्स (सुमारे 8.4 अब्ज येन) इतका प्रचंड खर्च येणार आहे. त्यामुळेच प्रशासनाने त्या इमारती पाडण्याची योजना बनवली आहे, असे हिरोशिमा नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या