
कोकणच्या शिमगोत्सवातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला आणि अंगावर शहारे आणणारा सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील ऐतिहासिक ‘हुडोत्सव’ यंदाही मोठय़ा उत्साहात आणि पारंपरिक थाटात पार पडला. 100 फूट उंच हुडय़ावर चढलेले देवीचे अवसार आणि त्यांच्यावर होणारा दगडांचा वर्षाव असा हा चित्तथरारक सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतून हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यामध्ये सर्वत्र ख्याती असलेला हा उत्सव भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. हा उत्सव पाथर धनगरणीचे खेळ आणि वाघाचा खेळ यांसारख्या पारंपरिक खेळांसह साजरा होतो. उत्सवामधील दगडफेकीचा पारंपरिक थरारक सोहळा पाहण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यांसह शेजारील गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून हजारो भाविक हजेरी लावतात. तसेच सध्या मुंबई, ठाण्यामध्ये वास्तव्याला असलेले नागरिकही आपला गावचा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून गावामध्ये येतात.
शंभर फुटी हुडय़ावर दगडांचा वर्षाव
या उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हुडय़ावरील दगडफेक. सायंकाळच्या वेळी जेव्हा भावई देवस्थानचे अवसार हुडय़ाच्या शिखरावर पोहोचले, तेव्हा खाली उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी त्यांच्या दिशेने दगड मारले. हुडय़ावर असलेल्या संचाराला ज्याचा दगड लागतो, तो भाविक स्वतःला भाग्यवान समजतो, अशी पुरातन श्रद्धा येथे जपली जाते. ‘भल्ली-भल्ली भावई’च्या जयघोषाने यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
भावा–बहिणीची भावूक भेट आणि पालखी सोहळा
शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी या उत्सवाची सुरुवात झाली. परंपरेनुसार, आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल आणि कोलगावचा श्री देव कलेश्वर यांनी आपली बहीण श्री देवी भावई हिची भेट घेतली. तिन्ही गावांच्या सीमेवर हा भावूक भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर तिन्ही गावांची निशाणे हुडय़ाच्या ठिकाणी दाखल झाली. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात देवीचे अवसार (संचार) गगनचुंबी 100 फुटी हुडय़ावर एकामागोमाग एक चढले.
लंडनहून आलेले कुटुंब आणि पारंपरिक खेळ
या उत्सवाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे ‘वाघ शिकार’ आणि ‘घोडेमोडणी’. ही परंपरा जपण्यासाठी कुणकेरकर कुटुंब विशेषतः लंडनहून दरवर्षी गावात दाखल होते. यासह रोंबाट, पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली मिरवणूक, पाथर धनगरणीचा दगड, जड दगड उचलण्याचे पारंपरिक साहसी खेळ, महिलांची उपस्थितीः या सोहळय़ात महिला भाविकांची संख्याही लक्षणीय होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्याने कोकणच्या संस्कृतीचे आणि लोकपरंपरेचे दर्शन घडवले.


























































