
एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) या देशातील अग्रगण्य कंपनीमधील सर्व कर्मचारी संघटना आणि अधिकारी संघटनांचे विलीनीकरण झाले असून त्यांनी ‘भारतीय विमा कर्मचारी सेनेशी’ संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणामुळे आता कंपनीचे देशभरातील 500हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी एकाच झेंड्याखाली आणि एकाच नेतृत्वाखाली आले आहेत. कामगार चळवळीतील भारतीय विमा कर्मचारी सेनेचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण विजय मानला जात आहे.
शिवसेना नेते – खासदार व भारतीय विमा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या कुशल आणि खंबीर नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच तत्पर राहणाऱ्या भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटना प्रतिनिधींनी सांगितले. हा मैलाचा दगड पार पाडण्यासाठी अपार कष्ट, समर्पण आणि अथक परिश्रम घेणाऱ्या एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सर्व स्थानिक नेत्यांचे आणि सदस्यांचे भारतीय विमा कर्मचारी सेनेकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या हिताचा लढा अधिक तीव्रतेने लढणार
भारतीय विमा कर्मचारी सेना ही नेहमीच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिली आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परिवाराचे आमच्या संघटनेत स्वागत असून कर्मचाऱ्यांच्या हिताचा लढा यापुढे अधिक तीव्रतेने लढला जाईल, असे भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे महासचिव दिनेश बोभाटे यांनी सांगितले.



























































