जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करणारा सराईत चोर जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

केवळ जैन मंदिरांना टार्गेट करीत देवतांच्या आभूषणांची चोरी करणाऱया एका सराईत चोराच्या घाटकोपर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी घाटकोपर व अंधेरी येथील मंदिरामंमधून मुकुट चोरीच्या गुह्यांची उकल करीत चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे.

घाटकोपर पश्चिमेकडील नवरोजी क्रॉस लेनवर मुनीश्वर स्वामींचे मंदिर आहे. 24 एप्रिलच्या सकाळी 10.30 च्या सुमारास मुनीश्वर स्वामींचा दोन किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. या घटनेमुळे जैन समाजासह परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश काटकर, पोलीस निरीक्षक विलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीप बने, उपनिरीक्षक मैत्रानंद खंदारे तसेच अशोक भोसले, किरण चव्हाण, शशिकांत पाटील, अमोल दरेकर, विनोद वाघ आणि विनोद पवार या पथकाने तपास सुरू केला. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एक कॅप घातलेला इसम मंदिरात येताना व मुकुट चोरून नेताना कैद झाला होता. पोलिसांनी त्या आठवडय़ातील सर्व दिवसांचे फुटेज तपासल्यावर तो इसम घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंदिरात आला होता आणि रेकी करून गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलिसांनी अशी गुह्याची पद्धत कोणाची असेल याचा अभ्यास केला तसेच खबऱयांना कामाला लावले. तेव्हा भुलेश्वर येथे राहणारा नरेश अगरचंद जैन (40) हा मंदिरांमध्ये चोऱया करीत असल्याचे समोर आले. नरेशला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने घाटकोपर तसेच अंधेरी येथील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला.

सहज शक्य होते म्हणून…
नरेशविरोधात भायखळा, आग्रीपाडा, काळाचौकी, एल. टी. मार्ग, आझाद मैदान, वडाळा, अंधेरी या पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे. तो स्वतः जैन समाजाचा असून तो चोऱयादेखील शक्यतो जैन मंदिरांमध्येच करतो. मंदिरांमध्ये चोऱया करणे सहज शक्य होते. शिवाय देवाची सोन्या-चांदीची आभूषणे किंवा मूर्ती विकण्यासदेखील डोकेदुखीचे नसते म्हणून तो देवतांना टार्गेट करतो, असे पोलिसांनी सांगितले.

चेहरा दिसू नये म्हणून कॅपचा सहारा
नरेश हा सराईत चोरटा आहे. चोरी करण्याआधी तो मंदिरात जाऊन रेकी करतो. मंदिरांमध्ये सीसीटीव्ही असतात त्यामुळे त्यात आपला चेहरा कैद होऊ नये यासाठी तो कॅप घालतो. जैन मंदिरांमध्ये कशा प्रकारे वावरायचे हे माहीत असल्याने त्याचा तो फायदा उचलतो. सीसीटीव्ही ओळख पकडली जाऊ नये याची तो सर्वतोपरी प्रयत्न करतो.