
हरयाणामधील जिंद इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथल्या एका एड्सग्रस्त तरुणाने त्याला हा जीवघेणा रोग जडल्याचे न सांगताच लग्न केले. त्याच्यामुळे त्याच्या बायकोलाही आता एड्सची लागण झाली आहे. या तरुणाच्या खोटारडेपणामुळे एका निरोगी आणि निष्पाप तरुणीचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. पोलिसांनी या खोटारड्या तरुणासह एकूण 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले आहे की लग्नानंतर तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली होती. तिच्या नवऱ्याची तब्येत अचानक बिघडली होती, तेव्हा तिला कळालं की त्याला एड्सची लागण झालेली आहे.
पीडित महिलेचे लग्न कैथल इथे राहणाऱ्या एका तरुणाशी झाले होते. लग्नानंतर तिला कळालं की तिचा नवरा एड्सग्रस्त आहे. तिच्या सासरच्यांनी तिला समाजाची भीती दाखवत गप्प बसवलं होतं. ही बाब कोणाला सांगितलीस तर परिणाम वाईट होतील अशी धमकीही तिला देण्यात आली होती. तिला धमकावण्यामध्ये नणंद आणि सासूसासऱ्यांचा समावेश होता. पीडित महिलेने तिच्या नवऱ्यासह या तिघांविरोधातही तक्रार नोंदवली होती, ज्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2018 साली केलेल्या अभ्यासात हिंदुस्थानमध्ये एचआयव्ही आणि एड्सग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे दिसून आले होते. दोन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा आकडा 1 लाख 20 हजारांवर पोहोचला होता जो इतर दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक होता. यामुळे या आजारावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास 2030 पर्यंत जगभरात दररोज 80 तरुण या आजारामुळे मृत्यूमुखी पडतील असा इशारा युनिसेफने चिल्ड्रेन, एचआयव्ही अॅण्ड एड्स द वर्ल्ड इन 2030 च्या अहवालात दिला होता.
दरम्यान दक्षिण आशियाई देशांमध्ये लहान मुलं, तरुण व गर्भवती महिला व मातांना एड्सची लागण होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत असेही युनिसेफने या अहवालात म्हटले होते. एचआयव्ही विषाणू थेट शरीरातील रोगप्रतिकार शक्तीवरच हल्ला करतो. त्यामुळे या विषाणूंची लागण झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमी होते आणि एड्स होतो. त्यानंतर विविध आजारांनी शरीर खंगते. अशा व्यक्तीने जोडीदाराबरोबर असुरक्षित शरीरसंबंध ठेवल्यास त्यालाही एड्सची लागण होते. तसेच दूषित रक्तातूनही या रोगाची लागण होते.
एड्सबाबत अनेक गैरसमज आहेत गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली मार्च महिन्यात केरळच्या पाठ्यपुस्तकात एड्सबाबत एक अजब तर्कट असणारा धडा सामील करण्यात आला होता. लग्नाआधी किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होतो असे दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात मांडले होते. केरळमधील दहावीच्या बायोलॉजीच्या पुस्तकात हा चुकीचा उल्लेख केल्याने गोंधळ उडाला होता.
या पुस्तकात एचआयव्ही विषाणूंची माहिती देणारा एक धडा सामील करण्यात आला होता. त्यात एड्स हा दुर्धर आजार होण्याची कारणे देण्यात आली होती. यामध्ये लग्नाआधी किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होत असल्याचे देखील नमूद केले होते. हा प्रकार केरळमधील एका शिक्षिकेने सोशल मीडियावर उघडकीस आणल्यानंतर शिक्षण विभागाने ही चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.


























































