
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान हिजबुल मुजाहिद्दीच्या कमांडरने लालचौकात सेल्फी घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हिजबुलच्या कमांडरने कश्मीरमधील प्रसिद्ध लालचौकातील सेल्फी घेतलेला फोटो पोस्ट केल्याने सुरक्षा रक्षकासमोरील आव्हान वाढले आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, हिजबुल मजाहिद्दीनने याआधी 21 नोव्हेंबरला श्रीनगरमध्ये लालचौकात बैठक घेणारच असे चॅलेंज सुरक्षा एजन्सींना केले होते. यानंतर थोड्यात काळात हिजबुलकडून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यात एक कमांडर कश्मीरच्या लालचौकात सेल्फी घेताना दिसत आहे. त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उमर माजिद उर्फ हनजल्ला हा लालचौकात झालेल्या बैठकीचा मास्टरमाईंड़ असल्याचे वृत्त आहे. बैठकीनंतर लाल चौकातील घंटा घरसमोर हनजल्ला याने सेल्फी घेतला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. सध्या हा फोटो नक्की कधीचा आहे आणि खरा अथवा फोटोशॉप आहे याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि लष्कर संयुक्तपणे तपास करत आहे.

























































