Harry Potter च्या आगामी सीरिजमध्ये खलनायकाच्या जागी आता नवीन कोण? नेमकं काय होणार

हॅरी पाॅटरची अनोखी दुनिया लहानांसह मोठ्यांनाही भूरळ घालते. यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. परंतु आगामी सीरिजमध्ये मात्र चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखा बदलणार आहे. हॅरीच्या भूमिकेत डॅनियलची जागा डोमिनिक मॅकलॉघलिन घेईल, तर एमाची जागा अरेबेला स्टॉन्टन घेईल. तर हॅरी या प्रसिद्ध कलाकारानंतर प्रसिद्ध खलनायक व्होल्डेमॉर्ट देखील बदलला जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

हॅरी पॉटर या चित्रपटाची सीरिज ही परदेशासह हिंदुस्थानातही लोकप्रिय झाल्या आहेत. एचबीओने हा लोकप्रिय चित्रपट टेलिव्हिजनवर आणण्याची घोषणा केली तेव्हा चाहते निराश झाले. हॅरी पॉटरपासून ते हर्मिओन ग्रेंजरपर्यंत सर्व पात्र आता नव्याने बदलणार आहेत.

डोमिनिकच्या हॅरी पॉटर लूकच्या खुलाशानंतर, आणखी एका प्रसिद्ध पात्राला बदलण्यात येणार आहे. हे पात्र म्हणजे व्होल्डेमॉर्ट. हॅरी पाॅटरमधील प्रसिद्ध खलनायक म्हणून व्होल्डेमाॅर्ट सर्वज्ञात आहे. आगामी टेलिव्हिजन रूपांतरात पुरुष नाही तर एक स्त्री पात्र खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे समजते.

एंटरटेनमेंट स्कूपर डॅनियल रिचमन यांनी त्यांच्या अकाउंटवर माहिती शेअर करत म्हटले आहे की, “हॅरी पॉटर मालिकेतील व्होल्डेमॉर्टच्या भूमिकेसाठी ते पुरुष आणि महिला दोघांचेही ऑडिशन्स घेत आहेत, त्यामुळे यावेळी टीव्ही मालिकेत आपल्याला महिला व्होल्डेमॉर्ट दिसण्याची शक्यता आहे.”

अहवालांनुसार, निर्माते या रीबूटमध्ये जादूगारांच्या दुनियेबद्दल नवीन दृष्टीकोन सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मूळ हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये राल्फ फिएन्सने ही भूमिका साकारली होती.