
हिंदुस्थानच्या हॉकी संघाने आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. हिंदुस्थानने अंतिम लढतील दक्षिण कोरियाचा 4-1 असा धुव्वा उडवला आहे. हा विजय हिंदुस्थानच्या संघासाठी विशेष ठरला असून आशिया चषक जिंकण्यासोबत हिंदुस्थानचा संघ थेट विश्व चषकासाठी पात्र ठरला आहे.
हिंदुस्थानच्या संघाने सामन्याची सुरुवातच अगदी दणक्यात केली आणि पहिल्या मिनिटातच पहिला गोल केला. सुखजीत सिंगने हिंदुस्थानच अवघ्या 30 सेकंदातच खात उघडलं. त्यामुळे पहिल्या मिनिटापासूनच संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण करण्यास सुरुवात केली. दिलप्रीत सिंगने 28 व्या आणि 48 मिनिटाला गोल केले आणि त्यानंतर अमित रोहितदासने गोल करत संघाचा विजय निश्चित केला. आशिया चषकावर नाव कोरण्यासाठी संघाला तब्बल 8 वर्ष वाट पाहावी लागली, पण अखेर प्रतिक्षा संपली. यापूर्वी हिंदुस्थानच्या संघाने 2017 साली आशिय चषक जिंकला होता. या विजयामुळे हिंदुस्थानचा संघ आता थेट हॉकी विश्व चषकासाठी पात्र ठरला आहे.