हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप त्याच्यासोबत काम केलेल्या एका महिला कर्मचाऱ्यानेच केला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणीही नसून फास्ट अँड फ्युरियस फेम विन डिझेल आहे. विनवर त्याच्यासोबत त्याची सहकारी म्हणून काम केलेल्या एस्टा जोनासन हिने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.

एस्टा हिच्या म्हणण्यानुसार, 2010मध्ये विन डिझेल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिला नोकरीवरूनही काढून टाकलं होतं. अटलांटा नावाच्या हॉटेलच्या खोलीत त्याने तिच्यावर लैंगिक हेतूने हल्ला करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या फास्ट अँड फ्युरियस 5 साठी ते दोघं एकत्र काम करत होते. हा आरोप करून एस्टाने लॉस एंजेलिस न्यायालयात खटला दाखल केला आहे.

या आरोपांनुसार, विन डिझेल याने एस्टा हिच्या खासगी अवयवांना जबरदस्तीने स्पर्श करून तिचं चुंबन घेतलं होतं. त्याने आपल्या हॉटेलच्या खोलीत अनेक महिलांसोबत रात्र काढली होती. तसंच, तिच्यासोबतही तो रात्र घालवू इच्छित होता. त्याच्या या वागण्यावरून त्याला सुधरण्यासाठी वारंवार सांगूनही विनने कधीही एस्टाकडे लक्ष दिलं नव्हतं. अटलांटा हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर विनने तिला कामावरूनही कमी केलं होतं, असं एस्टाचं म्हणणं आहे. या आरोपांवर विनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.