गृहमंत्र्यांच्या शहरात 24 दिवसांत 13 हत्या, नागपुरात भरदिवसा घरात घुसून पूर्वाश्रमीच्या पत्रकाराचा खून

नागपुरात दिवसाढवळय़ा घरात घुसून एका पूर्वाश्रमीच्या पत्रकाराची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे राज्याचे गृहमंत्री शहरात असताना ही हादरवणारी घटना घडली. नागपुरात अक्षरशः गुंडाराज सुरू असून गेल्या 24 दिवसांत 13 हत्या झाल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

विनय ऊर्फ बबलू पुणेकर असे हत्या झालेल्या माजी पत्रकाराचे नाव आहे. ते काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. सध्या ते दिनशॉ पंपनीत मार्पेटिंगमध्ये कार्यरत होते. पैशांच्या व्यवहारातून त्यांचा अनेकांसोबत वाद होत होता. या वादातून त्यांचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी दीड वा.च्या सुमारास पुणेकर हे राजनगर येथील आपल्या घरी झोपले होते. त्यावेळी एक युवक त्यांच्या घराचा गेट उघडून आत घुसला आणि पुणेकर यांच्यावर गोळय़ा झाडल्या.  अचानक झालेल्या या हल्ल्यात पुणेकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक पुणेकर यांच्या घरात शिरून थोडय़ाच वेळात लगबगीने बाहेर निघतानाचे दृष्य पैद झाले असून त्यानुसार पोलीस फुटेजमधील युवकाचा शोध घेत आहेत.

राज्याचे गृहमंत्री ज्या शहरातून येतात तेथेच 24 दिवसांत 13 हत्येच्या घटना घडल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे नागपूरकरांचे म्हणणे आहे. अजून किती लोकांचे जीव गेल्यानंतर सरकार जागे होणार, असा सवाल नागपूरकर करीत आहेत.