गिरणी कामगारांना एकत्रितरीत्या घरे देण्याचा प्रयत्न, गृहनिर्माणमंत्री जीतेंद्र आव्हाड यांचे निर्देश

1204
mantralaya-5

मुंबईतील गिरणी कामगारांना ‘ना विकास’ क्षेत्रात एकत्रितरीत्या घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने म्हाडा आणि महसूल विभागाने पाहणी करून येत्या 15 दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत आज झालेल्या बैठकीत गृहनिर्माणमंत्री बोलत होते. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसनाच्या काही रखडलेल्या योजनांचाही आढावा घेतला व योजना गतीने पूर्ण करण्यासंदर्भात अधिकाऱयांना निर्देश देण्यात आले.

यावेळी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी राधाकृष्णन बी.,नागपूर सुधार प्रन्यास सभापती शीतल उगले, ‘नवाकाळ’च्या संपादिका जयश्री खाडिलकर-पांडे, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे जयप्रकाश भिलारे, गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रवीण घाग, दत्ता इस्वलकर, सेंचुरी मिल कामगार एकता संघाचे नंदू पारकर, हेमंत गोसावी यांच्यासह गृहनिर्माण, नगरविकास, महसूल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, कामगार आयुक्त कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अभ्युदय नगर, नर्गिस दत्त नगरच्या पुनर्विकासाच्या अडचणी सोडवणार

अंधेरी येथील जुहू ताज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, काळाचौकी येथील अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, वांद्रे येथील नर्गिस दत्त नगर गृहनिर्माण संस्था आदी संस्थांच्या अडचणीसंदर्भातही मंत्री आव्हाड यांनी बैठक घेतली आणि या संस्थांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱयांना निर्देश दिले.

रहिवाशांची पात्रता निश्चित करण्यासाठी ‘बीडीडी सेल’

मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचे काम रखडल्याने स्थलांतरासंदर्भातील प्रश्नावरील उपाययोजना व बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या मागण्यांच्या अनुषंगानेही मंत्री आव्हाड यांनी आज बैठक घेतली. बीडीडी चाळीतील रहिवाशांची पात्रता -अपात्रता निश्चित करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱयाची नियुक्ती करून ‘बीडीडी सेल’ स्थापन केला जाईल, असे मंत्री आव्हाड यांनी सांगितले. रहिवाशांच्या पात्रतेचे निकष ठरविण्यात यावेत आणि ही प्रक्रिया सुलभ करावी, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या