
आरोग्य अधिकारी पदाच्या भरतीमध्ये सतत डावलले जात असलेल्या राज्यातील होमियोपॅथी डॉक्टरांनी आता आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. होमियोपॅथी डॉक्टरांच्या विविध संघटना त्यासाठी एकत्र आल्या असून नवी मुंबई येथे येत्या गुरुवारी या संघटनांची संयुक्त बैठक होणार आहे. त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. होमियोपॅथी डॉक्टरांच्या सर्वात जुन्या ‘हिम्पाम’ या संघटनेने राज्यभरातील विविध होमियोपॅथी संघटना तसेच सीसीएच, एमसीएचच्या आजी-माजी सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी वाशी येथील सेक्टर-२ येथील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन क्लबमध्ये दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. होमियोपॅथी डॉक्टरांना वेगवेगळी कारणे दाखवून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतून डावलण्याचा प्रयत्न होत असल्याने सरकार दरबारी दबाव निर्माण करण्यासाठी ही एकीची वज्रूमूठ कामी येईल, असा विश्वास ‘हिम्पाम’चे अध्यक्ष डॉ. एस. टी. गोसावी यांनी व्यक्त केला.



























































