हरिश्चंद्र गडावर जाणाऱ्या लोकांवर मधमाशांचा हल्ला, 100 जखमी

1213

महाशिवरात्री निमित्ताने नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर जात असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 100 भाविक जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. जखमींमध्ये पुणे जिल्ह्यातील भाविकांचा सर्वाधिक समावेश आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने हरीचंद्र गडावर पुणे, नगर, नाशिक आदी जिल्ह्यांतून हजारो भाविक येत असतात. शुक्रवारी दुपारी काही भाविक हरिश्चंद्र गडावर चढ-उतार करत असतानाच हरिश्चंद्रगडाचा पहिला टप्पा पार केल्यानंतर कड्याच्या कपारीत मध्यभागी असणाऱ्या मधमाशांच्या पोळाला अज्ञात पर्यटकाने दगड मारला. दगड मारताच मधमाशा उठल्या. यावेळी या ठिकाणाहून जाणाऱ्या अनेक भविकांना मधमाश्यांनी चावा घेतला. मधमाशा उठल्या असे समजताच भाविकांची एकच धावपळ उडाली. वनविभागाचे कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी भाविकांना थांबवले. सुमारे दीड तास भाविकांना चढ-उतार करण्यास थांबविण्यात आले होते.

दरम्यान, मधमाश्यांनी चावा घेऊन जखमी झालेल्या भाविकांना राजूर येथील ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या भाविकांमध्ये पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर परिसरातील संख्या अधिक होती. जखमींमध्ये अकोले तालुक्यातील 20हून अधिक भाविकांचा समावेश आहे. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या 17 जखमींना प्राथमिक उपचारानंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या