‘हॅनी ट्रप ब्लॅकमेलिंग’च्या जाळ्यात अडकला क्लास वन अधिकारी, 3 कोटींची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमधील जखणगाव येथे उघड झालेल्या ‘हनी ट्रप ब्लॅकमेलिंग’च्या प्रकाराला नगरमध्ये काम करणारा एक क्लास वन अधिकारीही बळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या अधिकाऱयाला महिलेसमवेत शरीरसंबंधाचे आमिष दाखवून त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून 3 कोटींची मागणी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दोनजण फरार आहेत.

सचिन खोसे (रा. हामीदपूर), अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर) यांच्यासह एका महिलेला अटक केली असून, महेश बागले (रा. नालेगाव), सागर खरमाळे (रा. नालेगाव) हे फारार आहेत.

नगर तालुक्यातील जखणगाव येथे एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे 1 कोटीची खंडणी मागण्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. आता या महिलेसह तिच्या अन्य साथीदारांवर असाच दुसरा गुन्हाही दाखल झाला आहे. एका शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱयाने याबाबत तक्रार दिली आहे.

आरोपींनी या अधिकाऱयाला महिलेसोबत शरीरसंबंधाचे आमिष दाखवून त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर 3 कोटी रुपये आणून दे, नाहीतर हा अश्लील व्हिडीओ पोलिसांना दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी या आरोपींनी दिली होती. यावेळी आरोपींनी या अधिकाऱयाच्या गाडीच्या डिक्कीतील 30 हजार रुपयांची रोकड आणि ऑनलाइन 50 हजार रुपये नातेवाइकांच्या खात्यावर वर्ग करून घेतले होते.

याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तातडीने तपास सुरू करून हमीदपूर येथील सचिन खोसे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता हा गुन्हा त्याने व त्याची साथीदार महिलेसह अमोल मोरे, महेश बागले व सागर खरमाळे यांना सोबत घेऊन केल्याची कबुली दिली. यापैकी तीन आरोपींना अटक केली असून, सागर खरमाळे व महेश बागले यांचा शोध सुरू आहे. या आरोपींनी अशा पद्धतीचे आणखी किती गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक आर. एन. राऊत, धनराज जारवाल, हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, संतोष लगड, पोलीस नाईक, योगेश ठाणगे, भानुदास सोनवणे, कॉन्स्टेबल धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे यांनी ही कारवाई केली.

नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा प्रकारे शरीरसंबंधाचे आमिष दाखवून व त्याचे अश्लील व्हिडीओ बनवून आणि ते पोलिसात देण्याची धमकी देऊन लूट केल्याची वा पैशांची मागणी केली असल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी.