मधमाशांच्या हल्ल्यात ममदापूर शेतकऱ्याचा मृत्यू , मुलासह दोघे गंभीर जखमी

निलंगा तालुक्यातील ममदापूर येथील दोन शेतकरी व एक लहान मुलगा शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गावाशेजारील जंगलात गेले होते. त्यावेळी लाकूड तोडताना अचानक झाडांची फांदी मधमाशांच्या पोळ्यावर पडली. त्यानंतर मधमाशांनी जिवघेणा हल्ला केला. त्यात तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ दवाखान्यात घेऊन जात असताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला असून, दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ममदापूर येथील शेतकरी विश्वंभर सिद्राम बिरादार (65) हे आणि शेतकरी पंडित माणिक म्हेत्रे (69) व त्यांचा नातू सोन्या अनंत म्हेत्रे (12) हे शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गावाशेजारील जंगलात गेले होते. त्यावेळी जंगलातील लाकूड तोडताना सदरील झाडाची फांदी अचानक आग्या मोहोळाच्या पोळ्यावर पडली. त्यानंतर बिथरलेल्या मधमाशांनी विश्वंभर बिरादार, पंडित म्हेत्रे व सोन्या म्हेत्रे या तिघांवर हल्ला केला.

या मधमाशींच्या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. मधमाशा चावल्यामुळे या तिघांच्याही अंगात प्रचंड आग पडल्याने जिवाच्या आकांताने ओरडत असताना तो आवाज आजूबाजूच्या लोकांच्या कानी पडला. तात्काळ त्या ठिकाणच्या लोकांनी जखमींना वाहनांतून उपचारसाठी घेऊन जात असताना शेतकरी विश्वंभर सिद्राम बिरादार यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेले शेतकरी पंडित म्हेत्रे व लहान मुलगा सोन्या म्हेत्रे यांच्यावर बसवकल्याण (कर्नाटक) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मयत विश्वंभर बिरादार यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन कासारबालकुंदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

आज शनिवारी सकाळी मयत शेतकरी यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. एकूणच या घटनेमुळे ममदापूर गाव व पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.